Chandrapur News : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आता नो रिव्हर्स, नो यू-टर्न; नियम मोडल्यास कठोर कारवाईचा बडगा
Chandrapur News : चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता पर्यटकांच्या जिप्सींना रिव्हर्स घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर सफारी दरम्यान यु-टर्न मारण्यासाठी देखील प्रतिबंध घालण्यात आला आहे.
Tadoba-Andhari Tiger Reserve : चंद्रपूरच्या (Chandrapur) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात (Tadoba Andhari Tiger Reserve) आता पर्यटकांच्या जिप्सींना रिव्हर्स घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर सफारी दरम्यान यु-टर्न मारण्यासाठी देखील प्रतिबंध घालण्यात आला आहे. टी 114 वाघिणीला घेराव करून डझनभर जिप्सी कोर भागात पर्यटन करत असल्याचे फोटो नुकतेच व्हायरल झाले होते. त्यानंतर ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने कठोर निर्णय घेत 10 जिप्सी, गाईड आणि चालक यांना पर्यटन साखळीतून निलंबित केले होते. त्यानंतर संबंधित घटकांची बैठक घेत प्रशासनाने हा नवा नियम लागू केलाय.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आता नो रिव्हर्स, नो यू-टर्न
दरम्यान गेल्या 2 दिवसात ज्या-ज्या पर्यटक जिप्सी आणि गाईड यांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. अशा विविध प्रकरणांमध्ये स्वतंत्र कारवाई करत 15 जिप्सी आणि गाईड यांना देखील एक आठवड्यासाठी निलंबित केले आहे. यामुळे गेल्या 2 दिवसात जिप्सींवरील एकूण कारवाईची संख्या 25 वर पोचली आहे. ताडोबात वाघ बघण्यासाठी पर्यटक हे जिप्सी चालक आणि गाईड यांच्यावर आणत असलेला दबाव लक्षात घेता, त्यांना शिस्त लावण्यासाठी हा धडक निर्णय घेण्यात आलाय.
नियम मोडल्यास कठोर कारवाईचा बडगा
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात 17 एप्रिलला सकाळच्या सफारी दरम्यान एक धक्कादायक घटना घडली होती. यात खातोडा ते मोहर्ली दरम्यानच्या रस्त्यावर पर्यटकांच्या जिप्सीने समोरून येणाऱ्या वाघाची वाट अडवून धरली होती. समोरून येणारा वाघ ऐन रस्त्यावरून जात असतांना त्याच्या मागे आणि पुढे अनेक जिप्सी असल्याचा एक फोटो वायरल झाला होता. सफारी दरम्यान अश्या प्रकारे वाघाची वाट अडवून धरणे पर्यटकांच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतं. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात याआधीही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नियम मोडणाऱ्या अनेक घटना उजेडात आल्या आहेत. मात्र प्रशासनाने अद्याप कारवाईचा बडगा उगारलेला नाही.
ताडोबातील वाघांमुळे वन विभागाला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होत असतो. मात्र महसूल प्राप्तीसाठी वन्यजीवांचं स्वातंत्र्य हिरावू पाहणाऱ्या ताडोबा प्रशासनावर आता रोष व्यक्त केला जात आहे. हा प्रकार उजेडात येताच सर्व स्थरातून रोष व्यक्त केला जात होता. परिणामी यावर संबंधीत प्रशासनाने कारवाई करत आता नवीन नियम लागू करण्यात आले आहे. यात पर्यटकांच्या जिप्सीला सफारी दरम्यान रिव्हर्स आणि यू-टर्न घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच हे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई देखील केली जाणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या