'काळ प्रत्येकाचा येतो, शंभर टक्के हिशोब चुकता करु', रविकांत तुपकरांचा राष्ट्रवादीला इशारा
स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनीही काळ प्रत्येकाचा येतो हिशोब चुकता करू असं म्हणत राष्ट्रवादीला इशारा दिला आहे.
मुंबई : करेक्ट कार्यक्रमाच्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो आणि तो मी करेन असा इशारा स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टींनी (Raju Shetti) राष्ट्रवादीला दिल्यानंतर आता स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनीही काळ प्रत्येकाचा येतो, हिशोब चुकता करू असं म्हणत राष्ट्रवादीला इशारा दिला आहे. एक विधानपरिषदेची जागा देण्याची शरद पवारांसोबत कमिटमेंट झाली होती, असंही ते म्हणाले.
रविकांत तुपकर म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ज्यावेळी 2019 साली काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर युती झाली. त्यावेळी लोकसभेच्या दोन जागा आणि एक विधानपरिषदेची जागा देण्याचा निर्णय झाला होता. प्रस्थापित पक्षांना चळवळीतले कार्यकर्ते व नेते चालत नसतात. नेहमीच चळवळींचा वापर फक्त राजकारण व मतं मिळविण्यासाठी झालाय. आम्ही आमदारकी किंवा खासदारकी साठी जन्माला आलो नाही , आम्हाला शेतकऱ्यांचा भरभक्कम पाठिंबा आहे. काळ प्रत्येकाचा येतो हिशोब चुकता करू, असं तुपकर म्हणाले.
तुपकरांनी म्हटलं आहे की, दिलेला शब्द राष्ट्रवादीनं पाळण्याची अपेक्षा होती. परंतु आता राजू शेट्टी यांचं नाव राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीतून वगळलं अशी माहिती मिळत आहे. राजू शेट्टी यांच्यासारखा माणूस त्या सभागृहात का नको? ते सभागृहात असणं शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेचं आहे. प्रस्थापित पक्षांना चळवळीतले कार्यकर्ते व नेते चालत नसतात. नेहमीच चळवळींचा वापर फक्त राजकारण व मतं मिळविण्यासाठी पाहिजे. पण जेव्हा चळवळीतील लोकांना द्यायची वेळ येते त्यावेळी सगळ्या प्रस्थापित पक्षांच्या पोटात दुखतं.
स्वाभिमानी शेतकरी संघटना भक्कम आहे. शेतकऱ्यांचा संघटनेवर विश्वास आहे. आम्ही आमदारकी किंवा खासदारकी साठी जन्माला आलो नाही , आम्हाला शेतकऱ्यांचा भरभक्कम पाठिंबा आहे. आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात नेहमी भांडण असतो. चळवळीला नख लावण्याचा प्रयत्न केला जातोय, काळ प्रत्येकाचा येत असतो. 100 टक्के हिशोब चुकता केला जाईल, असंही तुपकर म्हणाले.
काय म्हणाले राजू शेट्टी
विधानपरिषदेची एक जागा स्वाभिमानीला देणं ही काही कोणाची दया नाही, तो स्वाभिमानी आणि राष्ट्रवादीमध्ये झालेला समझोता आहे. आता केलेला समझोता पाळायचा की पाठीत पुन्हा धारदार खंजीर खुपसायचं हे राष्ट्रवादीनं ठरवायचं असं राजू शेट्टी म्हणाले. आम्ही त्यांच्या मागे आमदारकी द्या म्हणून कधी गेलो नव्हतो. करेक्ट कार्यक्रमाच्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो आणि तो मी करेन असा इशाराही राजू शेट्टींनी राष्ट्रवादीला दिला. मी एकदा निर्णय घेतला की मागे हटत नाही, जलसमाधी आंदोलन होणार असंही ते म्हणाले.
पूरग्रस्तांना आणि शेतकऱ्यांना राज्य सरकारने आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी राजू शेट्टी यांनी जलसमाधी आंदोलन सुरु केलं आहे. त्यांच्या या पदयात्रेच्या चौथ्या दिवशी देखील राज्य सरकारकडून कोणताही निर्णय नाही. या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं तर सरकारला महागात पडेल असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
मी महाविकास आघाडीचा गुलाम नाही, जिथं महाविकास आघाडी सरकार चुकतंय तिथे मी सरकारविरोधात ठामपणाने बोलणार. पूरग्रस्तांना मदत देताना सरकार चुकलंय, मी पॅकेज देणारा माणूस नाही असे मुख्यमंत्री म्हणाले होते. पण, पूरग्रस्तांना सरकारकडून काहीच मिळाली नाही असा राज्य सरकारला घरचा आहेर राजू शेट्टींनी या आधीच दिला होता.
संबंधित बातम्या :
- राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून राजू शेट्टींचं नाव वगळलं? राजू शेट्टींऐवजी हेमंत टकले यांच्या नावाची चर्चा
- मी महाविकास आघाडीचा गुलाम नाही; पूरग्रस्तांना मदत देताना सरकार चुकलंय : राजू शेट्टी
- पूरग्रस्तासंदर्भातील आदेश आठ दिवसात बदला अन्यथा सामूहिक जलसमाधी घेऊ, राजू शेट्टी यांचा राज्य सरकारला इशारा