Video : Omicron Variant : ओमायक्रॉन खरंच एवढा धोकादायक आहे का? सध्यातरी व्हेरियंटवर एकच पर्याय!
बाहेरील देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. देशांतर्गतसुद्धा योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. ओमायक्रॉनच्या व्हेरियंटच्या प्रसाराचा वाढता वेग पाहता नागरिकांनी खबरदारी घेतली पाहिजे.
मुंबई : जगभरात दहशत माजविणारा ओमायक्रॉन (Omicron Variant) आता भारतातही पसरला आहे. भारतात आता ओमायक्रॉनचे 21 रूग्ण झाले आहेत. तर महाराष्ट्रातही ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रूग्णांची संख्या 8 वर पोहोचली आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरासह राज्यातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ओमायक्रॉनचा वाढता प्रसार पाहता काय काळजी घेतली पाहिजे, याबाबत राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्यासोत एबीपी माझाने संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी, ओमायक्रॉनवर सध्या फक्त सर्वेक्षण हा एकच पर्याय असल्याचे सांगितले.
दक्षिण आफ्रिकेत प्रथम आढळलेला ओमायक्रॉन आता जगभरात पोहोचला आहे. त्यामुळे बाहेरील देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. शिवाय देशांतर्गतसुद्धा योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. ओमायक्रॉनच्या व्हेरियंटच्या प्रसाराचा वाढता वेग पाहता नागरिकांनी खबरदारी घेतली पाहिजे. त्याबाबत बोलताना डॉ. आवटे यांनी सांगितले की, या व्हेरियंटचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे. परंतु, त्याचे स्वरूप फार गंभीर नाही. काल पुण्यात सापडलेल्या सातही रूग्णांची लक्षणे गंभीर स्वरूपाची नाहीत. तर राज्यातील आठही ओमायक्रॉनच्या रूग्णांना जास्त त्रास जाणवत नाही. या सर्वांचीच प्रकृती स्थिर आहे.
घाबरण्याचे कारण नाही!
ओमायक्रॉनचा वाढता प्रसार पाहता लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, डॉ. आवटे सांगतात की, नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये. परंतु, कोरोना (Coronavirus) अजून आपल्या आसपास आहे. तो पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे लोकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. मास्कचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. शिवाय राज्य सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करावे.
ओमाक्रॉनवर एकच पर्याय
बाहेरील देशातून येणाऱ्या प्रवाशांवर कडक निर्बंध घालण्यासह त्यांची माहिती घेऊन आरोग्य यंत्रणा सतत त्यांच्या संपर्कात आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. इतर देशातून येणाऱ्या प्रवाशांकडे राज्य सरकारचं लक्ष आहे. प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. मागील महिन्याभरात इतर देशातून भारतात आलेल्या प्रवाशांचा देखील राज्य सरकार डेटा गोळा करत आहे. परंतु, आताची परिस्थिती पाहता फक्त सर्वेक्षण हा एकच पर्याय सध्या राज्य सरकारसमोर असल्याचे डॉ. आवटे सांगतात.
संबंधित बातम्या