Supriya Sule : अजित पवार महाराष्ट्राचे मोठे नेते; सुप्रिया सुळेंचा यूटर्न
पक्षातील लोकांनी विरोधात भूमिका घेतली आहे. त्यांची भूमिका आम्हाला मान्य नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत
पुणे : राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे राज्याचं (Supriya Sule) राजकारण ढवळून निघालं आहे. राष्ट्रवादीत फुट पडली नाही, अजित पवार महाराष्ट्राचे मोठे नेते आहे, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी युटर्न घेतला आहे. अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.
पक्षातील लोकांनी विरोधात भूमिका घेतली आहे. त्यांची भूमिका आम्हाला मान्य नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत, असं त्या म्हणाल्या आहेत आणि अजित पवारांच्या नेतृत्वावरदेखील त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
त्या म्हणाल्या की, अजित पवारांचं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रालाच मान्य आहे. सगळ्या पक्षांमध्ये अनेक चांगले नेते असतात. प्रत्येकामध्ये चांगले गुण असतात. आम्ही अटलबिहारी वाजपेयींचं नेतृत्व मान्य केलं, एनडी पाटलांचंही मान्य केलं. त्यामुळं असंख्य नेते विविध पक्षांमध्ये असतात. त्यामुळं त्यांच्यातील नेतृत्व त्यांच्यातील चांगले गुण हे समाजाला मान्यचं असतात, असं स्पष्ट नव्हे पण नेतृत्व मान्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
ज्या नेत्यांनी पक्षाची वेगळी भूमिका घेतली आणि टीका केली. त्यावेळी आम्हाला वेदना झाल्या होत्या. त्यांनी केलेले आरोप सगळे वास्तव्यापासून दूर होते. ज्या ज्या ताटात आपण एकत्र जेवलो त्यांच्यावर आरोप करणं त्यांचा अधिकार आहे पण काही आरोप हे न पटणारे होते, असंही त्या म्हणाल्या.
चंद्रशेखर बावनकुळे यांचे अभार
मी बावनकुळे यांचे आभार मानते. 303 खासदार आणि 105 आमदार त्यांच्याकडे आहेत. तरीदेखील त्यांना शरद पवार आणि सुप्रिया सुळे त्यांच्याकडे यावेसे वाटतात. याचा अर्थ शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये कुछ तो खास बात है, असं म्हणत त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे अभार मानले. सुप्रिया सुळे आणि शरद पवार काही दिवसांनी भाजपला पाठिंबा देणार असं वक्तव्य बावनकुळेंनी केलं होतं. त्यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट नाही...
मी पुन्हा एकदा सांगते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट नाही. पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जयंत पाटील हे अध्यक्ष आहे. मी आधी जे बोलले त्यावर मी ठाम आहे. पक्षातील नऊ आमदाराने दोन खासदारांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांना नोटीस पाठवलेली आहे, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.