(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ST Workers Strike : एसटी महामंडळाच्या खासगीकरणावर अखेर शिक्कामोर्तब : सूत्र
ST Workers Strike : एसटी महामंडळाच्या खासगीकरणावर अखेर परिवहन विभागाकडून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती एबीपी माझाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तापलेल्या एसटी संपावर (ST Strike अद्याप तोडगा निघालेला नाही. संप मोडीत काढण्यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. नजीकच्या काळात संपावर तोडगा न निघाल्यास एसटी महामंडळाचं खासगीकरण होणार आहे. एसटी महामंडळाच्या खासगीकरणावर अखेर परिवहन विभागाकडून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती एबीपी माझाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
मुंबई सेंट्रलमधील कार्यालयातील बैठकीत एकमुखानं निर्णय झाल्याची माहिती हाती आली आहे. एसटी महामंडळाचं टप्प्याटप्प्यानं खासगीकरण करण्यावर बैठकीत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यात लांब पल्ल्याच्या गाड्या खाजगी कंपनीला चालवण्यासाठी देण्यात येणार तर दुसऱ्या टप्प्यात शटल गाड्या खाजगी कंपनीला चालवण्यासाठी देण्यात येणार आहे. खाजगीकरणामुळे सध्या तरी तिकीट दरांत वाढ होणार नसल्याची सूत्रांची माहिती दिली आहे. शिवशाही आणि शिवनेरी गाड्या चालवणाऱ्या कंपन्यांचाच आगामी खासगीकरणासाठी एसटी महामंडळाकडून विचार करण्यात येत आहे. नजीकच्या काळात संपावर तोडगा न निघाल्यास खाजगी कंपन्यांना एसटी महामंडळ निमंत्रण देणार आहे.
दरम्यान आंदोलक एसटी कर्मचारी कामावर परत न आल्यास नव्या कामगारांना कामावर घेण्याचे स्पष्ट संकेत परिवहन मंत्र्यांनी दिले होते. 2019 साली सरळसेवा भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या 3 हजार 500 कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती एसटी महामंडळातील वरिष्ठ सूत्रांनी माझाला दिली आहे.
.एसटी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळात गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटी कर्मचारी होते. शिवाय परिवहन मंत्री अनिल परबही या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर एसटी संपावर तोडगा निघालेला नाही.
एसटी महामंडळातील 3 हजार 500 कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :