एक्स्प्लोर
Advertisement
सोलापूर जिल्ह्यात लाकूड, टायर जाळून उद्या कृत्रिम पावसाचा प्रयोग
सोलापुरातील तब्बल 1024 गावांमध्ये उद्या (शनिवारी) एकाचवेळी लाकडं, टायर आणि मीठ जाळून कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे.
पंढरपूर : कृत्रिम पावसासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन विमानांतून धूर काढला, मात्र त्याचा फारसा परिणाम न झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात वेगळीच तयारी सुरु आहे. सोलापुरातील तब्बल 1024 गावांमध्ये उद्या (शनिवारी) एकाचवेळी लाकडं, टायर आणि मीठ जाळून कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे.
सध्या सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून केवळ 40 टक्के पाऊस झाल्यामुळे रब्बीच्या पेरण्याही थांबल्या आहेत. अनेक गावात पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागल्याने बळीराजाही हतबल झाला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पुढाकार घेत मद्रास आयआयटीचे शास्त्रज्ञ श्रीहरी मराठे यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात एक खड्डा घेऊन त्यात वड, पिंपळ, उंबर अशा झाडांची 200 किलो लाकडं घालण्यात येणार आहेत. त्यावर 50 किलो खडे मीठ टाकून संध्याकाळी चार वाजता जाळण्यात येणार आहे. त्यामुळे तयार झालेला धूर आकाशात जाईल आणि सिल्व्हर आयोडाइडच्या प्रक्रियेमुळे पाऊस पडेल, अशी आशा प्रशासनाला आहे.
विशेष म्हणजे काल सांगोल्यातील महूद आणि मांजरी या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर हा प्रकार केल्यानंतर दोन्ही ठिकाणी जोरदार पाऊस पडला होता. सध्या हवामान विभागानेही उद्या पावसाचा अंदाज दिला असल्याने प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व गावात एकाच वेळी हा प्रयोग करण्याची तयारी पूर्ण केली आहे.
पावसाची सर्व नक्षत्रं कोरडी गेल्यानंतर आता परतीच्या पावसाचीही शेवटची आशा आहे. या सरकारी धुराने जर समाधानकारक पाऊस झाला, तर बळीराजाला थोडा दिलासा मिळेल. अन्यथा या महिनाअखेरीस सोलापूर जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याशिवाय शासनापुढे कोणताही पर्याय नसेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement