#Coronavirus Rumors | कोरोनाविषयीच्या सोशल मीडियावरील अफवांनी तरुणाच्या डोक्यावर परिणाम, मानसोपचार सुरु
कोरोनाबाबतच्या सोशल मीडियावरील अफवांचा फटका नांदेडमधील एका तरुणाला बसला आहे. या तरुणाला मानसोपचार घेण्याची वेळ आली आहे.
नांदेड : कोरोना व्हायरस भारतातही झपाट्यानं पसरू लागला आहे. त्यासोबतच कोरोना व्हायरसच्या अफवाचा प्रसार जोरदार सुरु आहे. या अफवांमुळे नांदेडमधील एका तरुणाच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं समोर आलं आहे. या तरुणावर मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने उपचार सुरु आहेत. कोरोना व्हायरसबाबत अत्यंत बेजवाबदार आणि चुकीची माहिती सोशल मीडियावर पसरवली जात आहे. याचा फटका अनेकांना बसताना दिसत आहे.
कोरोनाची देशभरात चर्चा सुरु असताना नांदेडच्या एका तरुणाने त्याबाबतची माहिती घेण्यासाठी इंटरनेटवर शोध सुरु केला. सोशल मीडियावर त्याला कोरोना आजाराची बरीच माहिती मिळाली. सोशल मीडियात सतत कोरोना आजाराची लक्षणे, उपचार, आजवर किती रुग्ण या आजाराने दगावली, याची माहिती तो सातत्याने सोशल मीडियावरुन घेत होता. मात्र मिळणारी माहिती खरी आहे की खोटी हे हा तरुण तपासत नव्हता. या तरुणाला साधारण सर्दी-खोकला झाला. त्यावेळी त्याने साधी औषधं घेतली. मात्र सातत्याने कोरोनाविषयीची माहिती वाचून आणि गप्पा ऐकूण त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आणि आपण आता मरणार असं तो सतत बडबडू लागला.
Coronavirus | राज्यात कोरोनाचे पाच रुग्ण, मुंबईत एकही रुग्ण आढळलेला नाही : राजेश टोपे
अखेर या तरुणाला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेण्यात आलं. डॉक्टरांनाही तो आपल्याला कोरोना व्हायरस झाल्याचं सांगू लागला. या आजाराची माहिती सोशल मीडियातून मिळाल्याची माहिती त्याने डॉक्टरांना दिली. मग डॉक्टरांनी त्याचे समुपदेशन केलं, सोबत औषधेही दिली. अखेर तो रुग्ण आता बरा झाला आहे.
Coronavirus | कोरोनाबद्दल हे माहित असायलाच हवं!
सोशल मीडिया हा चांगला की वाईट यावर अनेक मतं असू शकतात. मात्र कोरोना या आजाराने आता काही ठिकाणी गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळेच अशा संसर्गजन्य आजाराच्या बाबतीत सोशल मीडियामध्ये माहिती, पोस्ट करताना प्रत्येकाने जबाबदारीने पोस्ट करायला हव्यात. कोणतीही माहिती खात्री केल्याशिवाय टाकणे हे एखाद्याच्या जीवावर बेतू शकतं, हे नांदेडच्या या घटनेवरुन दिसून येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आलेला मेसेज माहिती न घेता फॉरवर्ड करणं थांबवा आणि जबाबदार नागरिक बना.
coronavirus | कोरोनातून बऱ्या झालेल्या महिलेच्या अनुभवाची पोस्ट व्हायरल
Coronavirus Outbreak | पुण्यातल्या दाम्पत्याच्या मुलीसह विमानातल्या सहप्रवाशाला कोरोनाची लागण