Coronavirus | राज्यात कोरोनाचे पाच रुग्ण, मुंबईत एकही रुग्ण आढळलेला नाही : राजेश टोपे
मुंबईत कोरोनाचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. वीणा टूर्समधून जे कुणी परदेशी गेले होते, त्यांच्या संपर्क झाला आहे. त्यांच्या सर्वांच्या तपासण्या सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मुंबई : कोरोना व्हायरसच्या सद्यस्थितीबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. सध्या राज्यात पाच कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. मुंबईत कोरोनाचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. गेल्या काही दिवसात परदेशी जे नागरिक गेले होते, त्यांच्याशी संपर्क झाला आहे. त्यांच्या सर्वांच्या तपासण्या सुरु आहेत. तसेच कोरोनाबाबत पाच सदस्यीय समिती स्थापन करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. एकट्या सार्वजनिक आरोग्य खात्यावर ताण येऊ नये म्हणून गृह खातं, महसूल, वैद्यकीय, शिक्षण खात्याचे अधिकारी एकत्र काम करतील, असं टोपे यांनी सांगितलं.
पुण्यातील कोरोनाची लागण झालेल्या कुटुंबाने ज्यांच्याशी संपर्क साधला त्या सर्वांच्या तपासण्या सुरु आहेत. यासाठी एक टीम काम करत आहे. शासनाच्यावतीने सर्व यंत्रणा सज्ज आहे. आरोग्यासंबधीची सर्व उपकरणे उपलब्ध व्हावीत यासाठी प्रयत्न सुरु आहे. कोरोना बाधित रुग्णांसाठी वेगळे वॉर्डही तयार केले जात आहेत. कोरोनाबाबत जनजागृतीचं काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आलंं आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
कोरोनाबाबत अनेक अफवा देखील सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून पसवल्या जात आहेत. या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नका, घाबरून जाऊ नका, असं आवाहनही राजेश टोपे यांनी केलं आहे.
आयपीएलसारख्या स्पर्धा ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक जमतात, त्या स्पर्धांना परवानगी द्यावी की नाही याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊ शकते. याशिवाय प्राथमिक, माध्यमिक शालांत परीक्षा लवकर घेऊन शाळांना लवकर सुट्टी देण्याबाबत आणि राज्य विधिमंडळाचे अधिवेशन लवकर संपवण्यावर चर्चा होऊ शकते, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
CoronaVirus Update | कोरोना संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी होणार : राजेश टोपे