(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलाच्या डोक्यावर हात ठेऊन सांगावे?; पुण्यातील कंपन्यांवरुन नितेश राणेंचा सवाल
पुण्यातील राजीव गांधी इन्फोटेक पार्क म्हणजेचं पुण्याच्या आयटी पार्कमधून 37 कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्यावरुन आता चांगलच राजकारण तापलं आहे.
अहमदनगर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुणे चांगलंच चर्चेत आह. अल्पवयीन मुलाच्या पोर्शे कार अपघातामुळे पुणे केंद्रस्थानी असून आमदार रवींद्र धंगेकरांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरल्याचं पाहायला मिळालं. त्यातच, माझं पुणे शहर चांगलं आणि पब संस्कृतीतून मला बाहेर काढायचं असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान, पुण्यातील 37 कंपन्या पुणे शहरातून बाहेर गेल्याची माहितीही त्यांनी शेअर केली होती. त्यानंतर, शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही (Uddhav Thackeray) याच मुद्द्यावरुन राज्यातील भाजपा-शिंदे सरकारवर हल्लाबोल केला होता. उद्धव ठाकरे लंडन दौऱ्यावर असल्याने, आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) त्यांच्या लंडन दौऱ्याचा उल्लेख करत पलटवार केला आहे. उद्धव ठाकरेंच्या सरकार काळातच या कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्याचं त्यांनी म्हटलं.
पुण्यातील राजीव गांधी इन्फोटेक पार्क म्हणजेचं पुण्याच्या आयटी पार्कमधून 37 कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्यावरुन आता चांगलच राजकारण तापलं आहे. पुण्यातील आयटी पार्कमधून कंपन्या बाहेर गेल्याचे सांगत उद्धव ठाकरेंनी राज्यातील महायुती सरकारवर हल्लाबोल केला. त्यावर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देत, गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्यात अव्वल असल्याचे म्हटले. तर, आता आमदार नितेश राणे यांनी थेट ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. नितेश राणे सध्या शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी गेले आहेत. यावेळी, पत्रकारांशी बोलताना राणेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी, पुण्यातील कंपन्यांवरुन ठाकरेंना सवाल केला. तसेच, ठाकरेंच्या काळात, कोरोनामध्येच ह्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्याचं त्यांनी म्हटलं.
ठाकरेंना लंडनमध्येच पॅकअप करा
पुण्यातील जेवढ्या कंपन्या बाहेर गेल्या, त्या कोरोना काळात गेल्या आहेत. उध्दव ठाकरेंच्या सरकारच्या काळातच या कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्या. उध्दव ठाकरे लंडनमध्ये बसून खोटी माहिती देत असल्याचं राणेंनी म्हटलं. तसेच, ठाकरेंना लंडनहून परत येवू द्यायचे का? याचा महाराष्ट्रातील जनतेने विचार करावा. लंडनमध्ये बसून महाराष्ट्राची प्रतिमा खराब करणाऱ्यांना लंडनमध्येच पॅकअप करा, अशा शब्दात नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच, कंपन्या आत्ता गेल्या हे उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेऊन सांगावे, असा सवालही उपस्थित केलाय. दरम्यान, उध्दव ठाकरे खोटारडे आहेत, असेही राणेंनी म्हटले.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे
''घटनाबाह्य मिंधे सरकार दिल्लीची हुजरेगिरी करण्यात व्यस्त असताना महाराष्ट्रातील हिंजवडी आयटी पार्कमधून 37 आयटी कंपन्या परराज्यात स्थलांतरित झाल्या आहेत. एका पाठोपाठ एक कंपन्या महाराष्ट्राबाहेर जात असतानाही मिंधे सरकार हाताची घडी घालून स्वस्थ बसलंय. हा सरकारचा निव्वळ निष्क्रीयपणा आहे. महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त सत्तेचा मलिदा खाण्यात मग्न आहे,'' अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यावर, आता आमदार नितेश राणेंनी पलटवार केला आहे.
वाहतूक कोंडीमुळे कंपन्या गेल्या
हिंजवडी आयटी पार्कमध्ये वाहतूक कोंडीमुळे अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी दीड तास लागतो. वाहतूक कोंडीत दररोज कर्मचाऱ्यांचा 1 तास वाया जातो. आयटी कंपनीकडून सेवा देताना कर्मचाऱ्याचे तासाचे सुमारे 25 डॉलर आकारले जातात. एक तास वाया गेल्याने प्रत्येक कर्मचाऱ्यामागे 25 डॉलरचे दैनिक नुकसान होत आहे, असा दावा हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या योगेश जोशी यांनी केला आहे. आमच्या संघटनेच्या सदस्य असलेल्या 37 कंपन्या गेल्या दहा वर्षांत हिंजवडी आयटी पार्कमधून बाहेर गेल्या आहेत. या कंपन्या कोरोना आणि त्या आधीच्या काळात स्थलांतरित झाल्याचं त्यांनी सांगितलं. अलीकडच्या काही महिन्यात एकही कंपनी पुण्यातील आयटी हबममधून स्थलांतरित झाली नसल्याची माहिती जोशी यांनी दिली.सदस्य नसलेल्या इतर कंपन्याही या काळात बाहेर गेल्या असून, तीही संख्या मोठी आहे. त्यामुळे आयटी पार्कमधील पायाभूत सुविधांची समस्या तातडीने सोडविण्याची आवश्यकता असल्याचं जोशी यांनी म्हटलं.