(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Buldhana News : धक्कादायक! पाण्याच्या टाकीचं अघोरी पद्धतीने पूजन; पाणी टंचाईचे भीषण संकट असताना अंद्धश्रद्धेचा प्रकार उघड
Buldhana News : संपूर्ण राज्यात पाणी टंचाईच भीषण संकट अधिक गहरं होत जात असताना बुलढाणा जिल्ह्यातील पळशी झाशी गावात अंधश्रद्धेचा विचित्र प्रकार समोर आला आहे.
Buldhana News : संपूर्ण राज्यात पाणी टंचाईच (Water Shortage) भीषण संकट अधिक गहरं होत जात असताना बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील पळशी झाशी गावात अंधश्रद्धेचा विचित्र प्रकार समोर आला आहे. यात एका अज्ञात व्यक्तीने गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीखाली अघोरी प्रकाराने पूजा केल्याचे उघड झाले आहे. सोबतच परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्नही त्याने केलाय. ही घटना काल रविवारच्या रात्रीच्या सुमारास घडली.
मात्र, सकाळी गावकऱ्यांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर गावात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कालांतराने कुणीतरी गावाच्या टाकीचे पूजन करून या टाकीत विष कालवल्याची अफवाही संपूर्ण गावात पसरली असल्याने गावातील नागरिक या टाकीतील पाणी पिण्यास आता घाबरत आहेत. हा संपूर्ण प्रकार उजेडात येताच गावात अनेक उलट-सुलट चर्चाना उधाण आले असून सर्वत्र भीतीची लाट पसरली आहे.
पाणी टंचाईचे भीषण संकट असताना अंद्धश्रद्धेचा प्रकार उघड
हा विचित्र प्रकार अल्पावधीतच संपूर्ण गावात पसरला. दरम्यान, परिसरातील अंधश्रद्धा निर्मूलनचे सक्रिय कार्यकर्ते असलेले अभय मारोडे यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत गावकऱ्यांची समजूत घातली. कोणीतरी हा खोडसाळपणा केला असून अघोरी पूजा आणि अंधश्रद्धेचा हा प्रकार असल्याचं गावकऱ्यांना सांगितलं. मात्र, तरीही गावकरी हे पाणी पिण्यास धजावत नाहीये. राज्यभरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई उद्भवलेली असताना अशाप्रकारे अघोरी कृत्य करून काही समाजकंटक दहशत पसरवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे या प्रकरणातून उघड झालं आहे. परिणामी पोलिसांनी यात हस्तक्षेप करत ही कृत्य करणाऱ्या आज्ञाताच शोध सुरू केला आहे.
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले
काही दिवसांपूर्वीच विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात असाच एक अंधश्रद्धेचा प्रकार समोर आला होता. यात गडचिरोलीच्या (Gadchiroli News) एटापल्ली तालुक्याच्या बार्सेवाडा येथे जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना काही गावकऱ्यांनी मिळून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर घडली होती. जमनी तेलामी (53), देऊ आतलामी (60) अशी मृतांची नावे असून याप्रकरणी 15 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, हे प्रकरण दुसऱ्या दिवशी उशीरा उजेडात आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती.
या घटनेत महाराष्ट्र दिन 1 मे रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास गावकऱ्यांनी एकत्र येत दोघांना अतिशय निर्दयीपणे मारहाण केली. त्यानंतर मरणासन्न अस्वथेत असलेल्या दोघांना ओढत नेत रात्री 10 वाजताच्या दरम्यान गावाबाहेरील नाल्यात पेटवून दिले. दुसऱ्या दिवशी उशीरापर्यंत याविषयी कुणालाच माहिती नव्हती. दरम्यान, पोलिसांना या प्रकरणाची कुणकुण लागताच त्यांनी तपासाची चक्रे फिरवून परिसरात विचारपूस सुरू केली. तपासादरम्यान गुन्ह्याचा उलगडा झाला आणि घटनास्थळी दोघांच्या मृतादेहांचा कोळसा झालेले आढळून आले.
इतर महत्वाच्या बातम्या