शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा पुण्यात नागरी सत्कार, पंतप्रधान मोदींसह दिग्गजांकडून शुभेच्छा
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज तिथीप्रमाणे शंभरावा जन्मदिवस आहे. त्यानिमित्त पुण्यातल्या शिवसृष्टीमध्ये त्यांचा लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पुणे : बाबासाहेब पुरंदरेंचं काम हे गौरवास्पद असून त्यांच्या शंभराव्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देण्याची संधी मिळाली हे आपलं भाग्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पुण्यामधील शिवसृष्टीमध्ये बाबासाहेब पुरंदरेंच्या शंभराव्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या.
छत्रपती शिवरायांचा विचार आणि कार्य आजही आपल्या देशाला प्रेरणा देत असून त्यांच्याशिवाय देशाचा विचारही करता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आदर्श बाबासाहेब पुरंदरेंनी देशासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय त्यापासून तरुण इतिहासकारांनी बरंच काही घेण्यासारखं आहे असंही मोदींनी नमूद केलं. गोवा मुक्ती संग्रामापासून ते दादरा नगर हवेलीच्या संघर्षापर्यंत बाबासाहेबांची भूमिका कौतुकास्पद ठरल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं.
आयुष्यभर शिवाजी महाराजांच्या इतिहासावर संशोधन करुन शिवचरित्र घराघरात पोहोचवणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा आज तिथीप्रमाणे 100 वा जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने पुण्यातील शिवसृष्टीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं असून लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या निमित्ताने बाबासाहेब पुरंदरेंना विविध स्तरातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरेंना एक विशेष पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आहेत. फक्त शिवराय आणि शिवचरित्र यावर गेली 80 वर्षे बोलणारे बाबासाहेब हे स्वत: एक विश्वविक्रम आहेत अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला आहे. आयुष्यभर शिवचरित्राची महापूजा मांडणाऱ्या साधकाला आपण विनम्र अभिवादन करतो असंही मुख्यमंत्री म्हणाले.
युगपुरुष छत्रपती शिवरायांचा तेजस्वी इतिहास सर्वदूर पोहोचवण्यासाठी आपण आजही प्रयत्न करत आहात, आपल्याला शंभराव्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा असा संदेश खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.
संबंधित बातम्या :