(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Majha Katta : शिवचरित्राचा प्रवास कसा सुरु झाला? शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितला प्रवास
आयुष्यात कसंलही व्यसन केलं नाही, कुठलंही औषध गोळ्या घेतल्या नाहीत. एकच व्यसन होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं, असं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी म्हटलं आहे.
मुंबई : मी 100 वर्षांचा झालोय, मात्र मी काही वेगळं केलेलं नाही. या आयुष्यात कसंलही व्यसन केलं नाही, कुठलंही औषध गोळ्या घेतल्या नाहीत. एकच व्यसन होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं, असं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी म्हटलं आहे. शिवचरित्राचं काम हाती घेतल्यानंतर एकदा जो मी शिवाजी महाराजांच्या चबुतऱ्याला चिकटलो ते चिकटलोच. मग माघार घेतली नाही. आजही मी डोंगर चढतोच आहे, असं मला वाटत, असं ते म्हणाले.
शिवचरित्रासाठी आयुष्य वाहिलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी माझा कट्टा कार्यक्रमात संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी देखील सांगितल्या. सोबतच शिवचरित्राचा प्रवास देखील उलगडवून सांगितला. लहानपणी आपण देखील काही करामतींमुळं मोठ्या लोकांचा मार खाल्ला असल्याचं त्यांनी बालपणीच्या आठवणी सांगताना ते म्हणाले.
पोर्तुगीजांविरुद्धच्या लढाईबाबत सांगताना ते म्हणाले की, आम्ही पावनेदोनशे तरुण पोरांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. परीक्षेला बसताना जसं वातावरण होतं तसं त्यावेळची स्थिती होती. त्यावेळी पाऊस सुरु होता, त्यावेळी आम्ही नदी नाले पार करत त्या ठिकाणापर्यंत पोहोचलो होतो, असं ते म्हणाले.
मराठी संस्कृती, मराठी परंपरेवर केलेल्या अभ्यासावर बोलताना बाबासाहेब म्हणाले की, हे मला सहज मिळालं. माझ्या घरातूनच मला हे संस्कार मिळाले. माझे आईवडील, माझे भाऊ यांच्याकडून हे संस्कार मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर हा शब्दांमधून नाही तर कृतीमधून दिसावा, असं बाबासाहेब पुरंदरे म्हणाले.
किल्ल्यांचं सवर्धन करण्याची गरज, आपलं महाराजांविषयीचं प्रेम वरवरचं
बाबासाहेब पुरंदरे म्हणाले की, 352 किल्ले महाराष्ट्रात आहेत. समुद्र किनाऱ्यावर 65 किल्ले आहेत. माझ्याकडं अनेकदा लोकं येतात की अमक्या किल्ल्याला असं करायचं आहे तसं करायचं आहे. कितीतरी किल्ले असे आहेत ज्या किल्ल्यांवर काहीही राहिलेलं नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. किल्ल्यांचं सवर्धन करण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले. आपलं महाराजांविषयीचं प्रेम वरवरचं आहे. काही गोष्टी पाहिल्यानंतर काही वेळासाठी आपलं प्रेम उफाळून येतं. किल्ल्यांवर नाव लिहिण्यासारखे प्रकार लोकं करतात.
गडकिल्ल्यांबाबत शासनाची, राज्यकर्त्यांची अनास्था का आहे याबाबत विचारलं असता बाबासाहेब म्हणाले की, ज्याला हौस नाही त्यानं लग्न करु नये अशी आपल्याकडं म्हण आहे. या म्हणीप्रमाणं माणूस हौशी पाहिजे, नवीन करण्याची हौस पाहीजे. ती हौस जागी करण्याचं काम आपल्या अभ्यासकांनी करायला हवं, असं ते म्हणाले.