अनिल परब ईडीच्या चौकशीला हजर राहणार; कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचा दावा
आपल्याला ईडीने (ED) का बोलावलं आहे याची माहिती नाही, या चौकशीदरम्यान जे प्रश्न विचारले जातील त्याची उत्तर आपण देणार आहोत असं अनिल परब (Anil Parab) म्हणाले.
मुंबई : ईडीने बजावलेल्या दुसऱ्या समन्सनंतर आता शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री अनिल परब (Anil Parab) चौकशीसाठी हजर राहणार आहेत. माध्यमांशी बोलताना अनिल परब यांनी ही माहिती दिली. आपण कोणताही गैरव्यवहार केला नसल्यानं आज ईडीच्या चौकशीला सामोरं जात असल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलं. (Anil Parab to appear before the ED)
अनिल परब म्हणाले की, "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या मुलींची शपथ घेऊन सांगत आहे की कोणत्याही गैरव्यवहारात आपला हात नाही. आपल्याला ईडीने का बोलावलं आहे याची माहिती नाही. या चौकशीदरम्यान जे प्रश्न विचारले जातील त्याची उत्तर आपण देणार आहोत."
ईडीने अनिल परब यांना दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. नेमक्या कोणत्या कारणासाठी आपल्याला चौकशीला बोलावलं आहे हे आपल्याला माहिती नसून ईडीला या प्रकरणी आपण संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं.
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात अनिल परब मुंबई आणि ठाण्यातील पोलीस दलातील बदल्या करत होते असं सांगितल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांकडून 50 कोटी रुपये वसूल करण्यासाठी अनिल परब यांनी सांगितलं होतं, असा दावाही सचिन वाझे यांनी पत्र लिहून केला होता.
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. अनिल देशमुखांच्या नंतर शिवसेना नेते अनिल परब आणि खासदार भावना गवळी यांना ईडीने नोटिस पाठवली आहे.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परबांच्या वर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर अनिल परब यांनी न्यायालयात 100 कोटी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
संबंधित बातम्या :