Shiv Sena Uddhav Thackeray : शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचे कोणते शिलेदार भाषण करणार? यादी समोर..
Shiv Sena Uddhav Thackeray Dasara Melava : शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला संबोधित करणाऱ्या वक्त्यांची यादी समोर आली आहे.
मुंबई : शिवसेनेच्या बंडखोरीनंतर आणि शिवसेना पक्ष (Shiv Sena) आणि निवडणूक चिन्ह गेल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचा (Shiv Sena UBT) यंदा पहिलाच मेळावा होत आहे. येत्या काही महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळावा होत असल्याने राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांचे मुख्य भाषण असलेल्या या दसरा मेळाव्यात ठाकरे गटाकडून कोणते शिलेदार भाषण करणार, याची उत्सुकता लागली आहे. ठाकरे गटांच्या वक्त्यांच्या नावाची यादी समोर आली आहे. ही यादी जवळपास निश्चित असल्याचे समजले जात आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे भाषण करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह गेल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचा यंदा पहिलाच मेळावा होत आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची अपात्रता प्रकरणी आलेला निकाल, निवडणूक आयोगाने शिंदे गटाला निवडणूक चिन्ह बहाल करण्याच्या निर्णयाला ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात भाजप-शिंदे सरकारसह केंद्र सरकारवरही टीका होण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाचे कोणते शिलेदार भाषण करणार?
दसरा मेळाव्याचे निवदेन आणि सूत्रसंचालन आदेश बांदेकर करणार आहेत. त्याशिवाय, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रमुख भाषण असणार आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत (Sanjay Raut), विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve), आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav), पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांची नावे वक्त्यांच्या यादीत असल्याची चर्चा आहे.
दसऱ्यानिमित्ताने आज होणाऱ्या सभांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे फटाके वाजणार आहेत. आज सगळ्या राज्याचे लक्ष शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे लागले आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाचे (दसरा मेळावे होणार आहे. मागच्या वर्षी झालेल्या दसरा मेळाव्यावर शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडखोरीची पार्श्वभूमी अधिक ठळकपणे होती. त्याशिवाय, ठाकरे गटाला मैदान मिळवण्यासाठी हायकोर्टापर्यंत धाव घ्यावी लागली होती. या पार्श्वभूमीवर झालेल्या दसरा मेळाव्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Dasara Melava Speech) यांनी बंडखोरांवर आणि भाजपवर टीकेचे बाण सोडले होते. यंदाच्या भाषणात उद्धव यांच्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेदेखील निशाण्यावर असणार आहेत. तर, अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.