(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बाटग्यांची उठाठेव! फक्त विरोधासाठीच; शिवसेनेचा 'सामना'द्वारे भाजपवर हल्लाबोल
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. भाजपचे नेते प्रत्येक वेळी केवळ विरोध करण्यासाठी कोणत्याही गोष्टीचा वापर करत असल्याचे अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.
मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी इंदिरा गांधी आणि करीम लाला भेटीबाबत विधान केलं होतं. त्यानंतर भाजपनं काँग्रेस आणि राऊतांवर हल्लाबोल केला आहे. याचा धागा पकडून 'सामना'मधून भाजपला लक्ष्य करण्यात आलं आहे.
इंदिरा गांधी या महान व्यक्तीमत्त्वाचा शिवसेनेनं कायमच आदर केल्याचं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांशी करीम लालाचे जिव्हाळ्याचे संबंध होते, असा दावाही 'सामना'च्या अग्रलेखात करण्यात आला आहे. कोल्हापुरात शिक्षा भोगलेल्यांना निवडणूक लढवण्यासाठी कोण रसद पुरवत होतं? असा सवालही सामनामधून भाजपला विचारण्यात आला आहे. शिवसेनेनं सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि इंदिरा गांधी यांचा वापर कधीच केला नसल्याचेही अग्रलेखातून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच भाजपचे नेते केवळ विरोध करण्यासाठी कोणत्याही गोष्टीचा वापर करत असल्याचे अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.
सामना अग्रलेख - बाटग्यांची उठाठेव! फक्त विरोधासाठी विरोध पंतप्रधान मोदी या उत्तुंग व्यक्तिमत्त्वास 'पेढेवाले' वगैरे थिल्लर उपमा देऊन त्यांचे हसे करणाऱ्यांच्या बाजूने संपूर्ण भाजप उभा ठाकला आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो, पण इंदिरा गांधीही प्रिय झाल्या याचा सगळ्यात जास्त आनंद आहे. इंदिराजींच्या स्मृती कायमच्या मिटाव्यात असे ज्यांना वाटते त्यांनाच इंदिराजींच्या व्यक्तिमत्त्वाची काळजी वाटावी हे आश्चर्यच. शिवसेनेने सदैव इंदिराजींच्या महान व्यक्तिमत्त्वाचा व त्यांच्यातील मर्दानगीचा आदर केला. जेव्हा इंदिरा गांधींचे प्रतिमाभंजन करण्याचा प्रयत्न झाला त्या त्या वेळी शिवसेना ढाल बनून मध्ये उभी राहिली. शिवसेनेने सोयीसाठी ना छत्रपती शिवरायांचा वापर केला, ना इंदिरा गांधींचा. तूर्त इतके पुरे!
भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांना समुपदेशनाची गरज असल्याचे आम्ही म्हणतो ते किती खरे आहे, याचे प्रत्यंतर आपल्या कृतीतून ते रोज देत आहेत. मूळ भाजप राहिला बाजूला, पण भाजपात घुसलेल्या इरसाल 'बाटग्यां'नी ऊठसूट सिलिंडर वर करून 'बांग' देण्याचे प्रकार सुरू केले आहेत. हे काही चांगल्या मानसिकतेचे लक्षण नाही. सत्ता हातून सटकल्याने निद्रानाशाचा रोग जडला हे समजू शकतो, पण त्या निद्रानाशातून त्यांना जे झटके व आचके येत आहेत त्यातून महाराष्ट्राच्या इभ्रतीस तडे जात आहेत. इतका बेजबाबदार विरोधी पक्ष महाराष्ट्राच्या इतिहासात निर्माण झाला नसेल, पण आधी अक्कल जाते व मग उरलेसुरले भांडवल जाते तसा काहीसा प्रकार सुरू आहे. सोयीनुसार टोप्या घालण्याचे व बदलण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. पंतप्रधान मोदी या उत्तुंग व्यक्तिमत्त्वास 'पेढेवाले' वगैरे थिल्लर उपमा देऊन त्यांचे हसे करणाऱ्यांच्या बाजूने संपूर्ण भाजप उभा ठाकला आहे. म्हणजे मोदी यांची तुलना सातारच्या पेढेवाल्यांशी केली हे भाजप नेतृत्वास बिनशर्त मान्य असेल तर प्रश्नच संपतो, पण राज्याच्या भाजप नेतृत्वाने एकदा तसे स्पष्ट करावे हे बरे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा फक्त स्वराज्यासाठी होता, स्वतःसाठी नव्हता, हे समजून घेतले पाहिजे. शिवरायांनी मावळ्यांना स्वराज्याचे ध्येय दिले होते. जुलूमाविरुद्ध लढण्याचे धैर्य दिले होते. हे शिवरायांचे नाव घेऊन विरोधासाठी विरोध करणाऱ्यांनी विसरू नये. शिवराय जरा समजून घ्या इतकेच त्यांना आम्हाला सांगायचे आहे. भाजपला आज 'मोदी पेढेवाले' प्रिय आहेत. आम्ही त्यांचे स्वागत करतो, पण इंदिरा गांधीही प्रिय झाल्या याचा सर्वात जास्त आनंद आहे. इंदिराजींचे व्यक्तिमत्त्व महान होते. त्यास तडे देण्याचे प्रकार मधल्या काळात सरकारकडून झाले. आता भाजपास वाटते की, इंदिरा गांधी यांचा अपमान झाला. त्यांना असे 'वाटणे' हाच इंदिराजींचा सन्मान आहे.
आम्ही करीम लाला व इंदिरा गांधी यांच्या भेटीसंदर्भात एका जुन्या घटनेचा उल्लेख केला. त्यामुळे काँग्रेसने खुलासा करावा वगैरे पांचट प्रश्न भाजपच्या थिल्लर यंग ब्रिगेडकडून विचारले जात आहेत. भाजपास सध्या विशेष काम नसल्याने ते अनेक विषयांचे उत्खनन करू लागले आहेत. राजकारणात कोण कधी कुणास भेटेल व भेटण्याची परिस्थिती निर्माण होईल ते सांगता येत नाही. तसे नसते तर ज्यांच्यावर देशद्रोहाचे, फुटीरतेचे आरोप आहेत अशा मेहबुबा मुफ्तीशी 'गुफ्तगू' करून सरकार बनविण्याची वेळ श्री. मोदी किंवा शाहांवर आली नसती. साठच्या दशकात करीम लाला हे गृहस्थ मुंबईत बसून जगभरातील पठाणांच्या समस्या सोडविण्यासाठी एक संघटना चालवीत होते व खान अब्दुल गफारखान ऊर्फ सरहद्द गांधी हे त्यांचे प्रेरणास्थान होते.
स्वातंत्र्यलढ्याशी निगडित पाकिस्तानातील प्रमुख दुवा म्हणून सरहद्द गांधी यांचे महत्त्व होते. त्यांची 'खुदाई खिदमतगार' ही संघटना होती व करीम लालासारखे तरुण त्या संघटनेशी जोडले गेले होते. धार्मिक आधारावर देशाची फाळणी होऊ नये अशी ठामपणे भूमिका घेणाऱ्यांपैकी खान अब्दुल गफारखान होते. पठाण समुदायास पाकिस्तानच्या अमलाखाली चांगले जीवन जगता येणार नाही ही त्यांची खंत होती व त्यामुळे पठाण समुदायातील अनेक तरुण अफगाणिस्तान, पाकिस्तान व काहीजण हिंदुस्थानात येऊन आपल्या अस्तित्वासाठी लढत होते. त्यातले एक गृहस्थ करीम लाला. ही माहिती सरकारी रेकॉर्डवर आहेच व त्याच काळात खान अब्दुल गफारखान यांचे काम करीम लाला मुंबईत राहून करीत होता व अनेक नेत्यांच्या गाठीभेटी व बैठकांत तो त्या वेळी दिसला आहे.
मुसाफिरखान्यात करीम लालाचे कार्यालय होते व त्यांच्या दर्शनी भागात करीम लालाचे जगभरातील अनेक प्रमुख नेत्यांबरोबरचे फोटो लावले होते. आज ते कार्यालय, त्यांचा तो दिवाणखाना अस्तित्वात नाही. त्यातील तसबिरी आजच्या भाजप नेत्यांनी पाहिल्या असत्या तर आज इंदिरा गांधी यांच्याबाबत जे आक्षेप घेत आहेत त्यांच्या डोळ्यांची बुबुळेच बाहेर पडली असती. सर्वच पक्षांच्या लोकांशी करीम लालाचे जिव्हाळय़ाचे संबंध होते व त्या वेळी मुंबईत अंडरवर्ल्ड नावाचा प्रकार सुरू व्हायचा होता. हा सर्व प्रकार खरे तर राजकारणात गेल्या काही वर्षांपासून जोरात सुरू आहे व मुख्य म्हणजे वाल्याचे वाल्मीकी करून घेणारे 'वॉशिंग मशीन' राजकारणात कोणी आणले व अशा नव्या वाल्मीकींसाठी पायघड्या कोणी घातल्या याचा खुलासा आम्ही करावा का?
ये पब्लिक है! सबकुछ जानती है! इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना कुणाला भेटल्या हा वादाचा विषय होऊच शकत नाही. पंतप्रधान म्हणून अनेकदा फुटीरतावाद्यांशी चर्चा कराव्या लागतात व अशा चर्चा अलीकडच्या काळात अनेकदा झालेल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातून थेट तुरुंगात कुणाचे फोन मागच्या काळात जात होते? का? कशासाठी? यावर अनेकदा स्फोट झाले आहेत. कोल्हापूरसारख्या ठिकाणी जन्मपेठेच्या शिक्षा भोगलेल्यांना निवडणुका लढविण्यासाठी रसद पुरवणारे कोण होते व अशा अनेक आधुनिक वाल्मीकींना पोलीस संरक्षण कसे मिळत होते? यावर खुलासे झाले तर अनेकांची तोंडे कायमची बंद होतील.
इंदिरा गांधी आज हयात नाहीत, पण त्यांच्या प्रतिमेचे भंजन करण्याचे उद्योग गेल्या पाच वर्षांत वारंवार झाले. इंदिराजी या शक्तिमान नेत्या होत्या. त्यांनी पाकिस्तानचे तुकडे करून फाळणीचा बदला घेतला. इंदिराजींच्या स्मृती कायमच्या मिटाव्यात असे ज्यांना वाटते त्यांनाच इंदिराजींच्या व्यक्तिमत्त्वाची काळजी वाटावी हे आश्चर्यच. शिवसेनेने सदैव इंदिराजींच्या महान व्यक्तिमत्त्वाचा व त्यांच्यातील मर्दानगीचा आदर केला. जेव्हा इंदिरा गांधींचे प्रतिमाभंजन करण्याचा प्रयत्न झाला त्या त्या वेळी शिवसेना ढाल बनून मध्ये उभी राहिली. शिवसेनेने सोयीसाठी ना छत्रपती शिवरायांचा वापर केला, ना इंदिरा गांधींचा. तूर्त इतके पुरे!