नाना पटोलेंच्या 'हातात' असेल तर त्यांनी आपली 42 मतं संभाजीराजेंना द्यावीत, संजय राऊतांचा खोचक टोला
संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांनी शब्द न पाळल्याच्या आरोपांवर खासदार संजय राऊत यांनी कोल्हापुरातून जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही चांगलाच समाचार यावेळी घेतला.
कोल्हापूर : संभाजीराजेंनी राज्यसभेच्या निवडणुकीतून रिंगणातून माघार घेतल्यानंतर शिवसेना आरोपांच्या पिंजऱ्यात आहे. शिवसेनेवर होत असलेल्या आरोपांना आणि संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांनी शब्द न पाळल्याच्या आरोपांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज कोल्हापुरातून जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही चांगलाच समाचार यावेळी घेतला.
नाना पटोलेंच्या हातात असेल, तर त्यांनी आपली ४२ मते संभाजीराजेंना द्यावीत, असा खोचक टोला लगावला. संभाजीराजे छत्रपती आणि आमचा विषय आहे, इतरांनी चोंबडेपणा करू नये, चंद्रकांत पाटील काही शिवाजी महाराजांचे वंशज नाहीत, असा जोरदार हल्लाबोल संजय राऊतांनी केला.
आमच्यासाठी संभाजीराजेंच्या उमेदवारीचा विषय संपल्याचे राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी राजेंच्या उमेदवारीवरून होत असलेल्या टीकेवरून भाजपला चांगलेच फटकारले. ते म्हणाले की, या राज्यात विरोधी पक्ष आहे पण ते विरोधासाठी विरोध करताना दिसत आहे. एखादा निर्णय घेतला की त्यावर टीका करायची हे त्यांनी ठरवलं आहे. यातून त्यांना कोणता असुरी आनंद मिळतो काय माहीत नाही, पण त्याची पर्वा न करता महाविकास आघाडी ठामपणे पुढे चालली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जाते.
संजय राऊतांचा संभाजीराजेंना टोला
मुख्यमंत्र्यांना आरोपाच्या पिंजऱ्यात उभं करणाऱ्या राजेंनाही संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे कुणाच्या मालकीचे नाहीत. महाराज संपूर्ण विश्वाचे आहेत. 42 मतांचा प्रश्न होता, राजकारण करत असताना कोणत्या ना कोणत्या पक्षाचा हात धरावा लागतो. यापूर्वी पक्षप्रवेश केलेला नाही का ? अशी विचारणा करत आम्हाला तोंड उघडायला भाग पाडू नका, असे राऊत म्हणाले. संभाजीराजे यांनी काल मन मोकळं केलं, आता आमच्यासाठी हा विषय संपल्याचे ते म्हणाले.
कोल्हापुरात शिवसंपर्क मोहिमेसाठी आलो आहे, गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जरा हॉट झालं आहे. माझा हा दौरा पूर्णपणे संघटनेच्या बांधणीसाठी आहे. शिवसेना पक्षप्रमुखांच्या ज्या सुचना आहेत त्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचवणे हा उद्देश आहे. 2024 सालच्या निवडणुकीसाठी शिवसैनिक तयार असला पाहिजे यासाठी हा उपक्रम असल्याचे राऊत यांनी सांगितले.
हे ही वाचलं का ?