(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोल्हापूर : गडहिंग्लजच्या अवघ्या 25 वर्षीय जवान प्रशांत जाधवांना लडाखमध्ये वीरमरण, अवघा दोन वर्षांचा संसार अन् 11 महिन्यांची लेक पोरकी
लडाखमधील तुर्तक सेक्टरमध्ये भारतीय लष्करातील जवान प्रवास करत असलेली खासगी बस श्योक नदीत कोसळल्याने ७ जवानांना वीरगती प्राप्त झाली. शहीदांमध्ये कोल्हापूर आणि सातारमधील दोन जवानांचा समावेश आहे.
कोल्हापूर : लडाखमधील तुर्तक सेक्टरमध्ये काल (ता. २८) भारतीय लष्करातील जवान प्रवास करत असलेली खासगी बस श्योक नदीत कोसळल्याने ७ जवानांना वीरगती प्राप्त झाली. शहीद झालेल्या जवानांमध्ये कोल्हापूर आणि सातारमधील दोन जवानांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे बुद्रुकमधील प्रकाश शिवाजी जाधव यांना वीरमरण आले, तर सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील विसापूर येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांनाही या भीषण अपघातात शहीद झाले. दोन उमद्या जवानांना अकाली जाण्याने दोन्ही कुटुंबावर दुर्दैवी संकट कोसळले आहे.
शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या पश्चात पत्नी पद्मा, अवघ्या ११ महिन्यांची कन्या नियती, वडिल शिवाजी आणि आई रेणुका असा परिवार आहे. प्रशांत आठ वर्षांपूर्वीच म्हणजेच २०१४ मध्ये बेळगावमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भरती झाले होते. त्यांचा पद्मा यांच्याशी २०२० मध्ये विवाह झाला होता. त्यांना अवघ्या ११ महिन्यांची नियती कन्या आहे. त्यामुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. प्रशात पत्नी पद्मा आणि मुलगीसह गुजरातमधील जामनगरमध्ये वास्तव्यास होते.
शुक्रवारी सकाळी लडाखमधील परतापूरमधून उपसेक्टर हनिफकडे बसमधून जात असताना ते प्रवास करत असलेली बस श्योक नदीत कोसळली. या अपघातामध्ये प्रशांत यांना वीरमरण आल्याची बातमी गावी पोहोचताच सर्वांनाच हादरा बसला.
प्रशांत जाधव यांचे आज पार्थिव गावी पोहोचणार
प्रशांत जाधव शहीद झाल्याचे समजताच बसर्गेमध्ये ग्रामस्थ तसेच तरुण मंडळांकडून अंत्यसंस्कारासाठी तयारी सुरु करण्यात आली. प्रशांत जाधव यांचे पार्थिव आज पोहोचणार आहे. त्यांच्या लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
General Manoj Pande #COAS & All Ranks of #IndianArmy offer deepest condolences to the bereaved families of #Bravehearts who made the supreme sacrifice in the line of duty at high altitude area in #Ladakh.#IndianArmy https://t.co/VhMBFS5gqD
— ADG PI - INDIAN ARMY (@adgpi) May 27, 2022
बसचा ताबा सुटल्याने नदीत कोसळली
अपघातग्रस्त बसमधून २६ जवान दहशतवाद्यांना चकवा देण्यासाठी खासगी बसने प्रवास करत असतानाच थोईसेपासून 25 किमी अंतरावर बसचा ताबा सुटला. त्यानंतर बस थेट नदीत कोसळली. दरम्यान, अत्यंत जखमी अवस्थेत जवानांना चंडीमंदीर येथील कमांड रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा ७ जणांना मृत घोषित करण्यात आले. गंभीर जखमी जवानांना हवाई दलाच्या मदतीने वेस्टर्न कमांड रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सुभेदार विजय शिंदे यांचे पार्थिव उद्या पोहोचणार
शहीद सुभेदार विजय शिंदे यांचे पार्थिव त्यांच्या सातारा जिल्ह्यातील विसापूर या मुळ गावी उद्या पोहोचणार आहे. ते १९९८ मध्ये मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये दाखल झाले होते. विजय शिंदे यांचे वडील सर्जेराव सुद्धा लष्करात होते, तर बंधू प्रमोद लष्करात कार्यरत आहेत. सुभेदार विजय शिंदे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली आणि भाऊ असा परिवार आहे.
हे ही वाचलं का ?
- Ladakh Road Accident: लडाखमध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात, 7 जवान शहीद
- Road Accident: धक्कादायक; रस्ते अपघाताचे प्रमुख कारण मोबाईल, केंद्रीय परिवहन विभागाची माहिती