Shiv Sena Foundation Day: शिवसेना वर्धापन दिनाचे दोन कार्यक्रम; ठाकरे-शिंदे यांच्या भाषणातून आरोपांचे कोणते बाण सुटणार?
Shiv Sena : शिवसेना पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच वर्धापन दिनाचे दोन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
Shiv Sena Foundation Day: मागील वर्षी शिवसेनेत फूट पडल्यानंतर यंदा पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त (Shiv Sena) दोन कार्यक्रम पार पडत आहेत. शिवसेना दसरा मेळाव्याची ओळख 'एक नेता..एक पक्ष...एक मैदान' अशी होती. दसरा मेळावादेखील ठाकरे आणि शिंदे गटाने घेतला होता. त्यानंतर आता दोन्ही गटांनी वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केले आहेत. ठाकरे गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम ष्णमुखानंद सभागृहात पार पडणार आहे. तर शिंदे गटाने गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
मागील वर्षी वर्धापन दिन पार पडला तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) होते. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. राज्यात विधान परिषदेची निवडणूक पार पडण्यास काही तासांचा अवधी होता. त्यावेळीदेखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकार पाडण्याचे आव्हान देताना ज्यांना पक्ष सोडून जायचा आहे, त्यांनी जावे असे म्हटले होते. त्यानंतरच्या काही तासांत विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केले. मध्यरात्री शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 17 आमदार नॉट रिचेबल झाले. त्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडीची सत्ता गेली. तर, दुसरीकडे शिवसेनेत मोठी फूट पडली.
पक्षात बंडखोरी केल्यानंतर भाजपसोबत सत्तेत आल्यानंतर शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यानंतर आता वर्धापन दिनही मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील गटाला निवडणूक आयोगाने अधिकृत पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्य बाण बहाल केले आहे. शिवसेनेच्या बंडानंतर आज शिंदे गट पहिल्यांदा वर्धापन दिन साजरा करणार आहे.
वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर शिंदे गटाकडून "शिवसेना" (shivsenaofc) हे अधिकृत फेसबुक पेज, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सोशल मीडियाच्या अकाउंटवरून पक्षाचे निर्णय, पक्षातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम, अभियान यांची माहिती वेळोवेळी प्रसारित करण्यात येईल. तसेच शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका यावरून प्रसारित करण्यात येणार आहे.
ठाकरे गटाची तयारी काय?
ठाकरे गटाच्या सोहळयासाठी राज्यभरातील पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर होणार आहे. वर्धापन दिन सोहळ्याला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या अगोदर संजय राऊत भाषण करतील. उद्धव ठाकरे संध्याकाळी 7 नंतर सभागृहात येऊन मार्गदर्शन करतील. ठाकरे गटाने रविवारी, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी महाशिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात मविआ सत्तेत असताना केलेली कामे, राजकीय संघर्ष आदी मुद्यांवर मार्गदर्शन करण्यात आले.
शिंदे गटाची तयारी काय?
शिंदे गटानेदेखील मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. नेस्को सेंटरमध्ये पदाधिकारी-कार्यकर्त्यांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्य भाषण होणार आहे. आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरेंवर आरोपांचे कोणते बाण सोडणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तसे संकेत दिले होते. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे लक्ष लागले आहे.