Asaram Bapu : शेम! गुजरातमध्ये बलात्कारी आसाराम बापूची पूजा, डॉक्टरांनी आरतीही म्हटली, नवरात्रीच्या कार्यक्रमावेळी प्रकार
Asaram Bapu Aarti in Surat Hospital : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सूरतमधील सरकारी रुग्णालयात आसाराम बापूच्या फोटोची पूजा करण्यात आली आणि त्याची आरतीही म्हटली गेली.

गांधीनगर : गुजरातमधील (Gujarat) सूरत (Surat) येथे नवरात्र (Navratri 2025) उत्सवात धक्कादायक घटना घडली आहे. येथील न्यू सिविल हॉस्पिटलमध्ये (Civil Hospital) बलात्काराच्या आरोपामध्ये दोषी ठरवण्यात आलेल्या स्वयंघोषित संत आसाराम बापू (Asaram Bapu) याचा फोटो लावून पूजा (Pooja) करण्यात आली. एवढेच नव्हे तर त्याची आरतीही म्हटली. यामध्ये डॉक्टर, नर्सेस आणि हॉस्पिटलमधील इतर कर्मचारी देखील सहभागी झाले. हा प्रकार समोर आल्यानंतर सरकारी इमारतीत बलात्कारी आरोपीचे उदात्तीकरण कसे केले गेले असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
Asaram Bapu Aarti in Surat Hospital : फोटो ठेवून आरती, मेडिकल स्टाफही सहभागी
ही घटना नवरात्राच्या पहिल्याच दिवशी घडली. सूरतच्या न्यू सिविल हॉस्पिटलच्या स्टेम सेल भवनाच्या गेटवर काही कर्मचाऱ्यांनी आसारामची प्रतिमा ठेवून पूजा त्याची केली. त्यावेळी झालेल्या आरतीत डॉ. जिगिश पटाडिया, नर्सिंग स्टाफ आणि सुरक्षा कर्मचारी देखील सामील झाले.
आसारामला 2018 मध्ये बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आले होते. तर 2023 मध्ये गांधीनगरच्या कोर्टाने त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सध्या तो जोधपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे.
Surat Hospital Asaram Pooja : व्हिडीओ व्हायरल, प्रशासनात खळबळ
या घटनेचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यानंतर आरोग्य प्रशासनात खळबळ उडाली आहे. न्यू सिविल हॉस्पिटलचे आरएमओ डॉ. केतन नायक यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, या कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी दिली नव्हती. फळवाटपाच्या नावाखाली हा प्रकार राबवण्यात आला असं नायक यांनी स्पष्ट केलं. या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत सुरक्षारक्षक आणि एका क्लास वन अधिकाऱ्याला तातडीने हटवण्यात आल्याची माहिती डॉ. केतन नायक यांनी दिली.
संपूर्ण चौकशी झाल्यानंतर या घटनेला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी काळजी घेऊ असंही सांगण्यात आलं.
Surat Hospital Asaram Pooja : बलात्कार प्रकरणात आसारामला शिक्षा
2013 मध्ये उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरच्या अल्पवयीन मुलीने आसारामवर जोधपूर आश्रमात बलात्काराचा आरोप केला. यानंतर आसारामला अटक झाली आणि प्रकरण कोर्टात गेले. एप्रिल 2018 मध्ये जोधपूर सेशन्स कोर्टाने आसारामला दोषी ठरवत आजन्म कारावास (Life Imprisonment) आणि 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला. 2001 ते 2006 दरम्यान गुजरातमधील गांधीनगर आश्रमात दोन महिला शिष्यांवर आसारामने वारंवार बलात्कार केल्याचे आरोपही कोर्टात सिद्ध झाले.
जानेवारी 2023 मध्ये गांधीनगर जिल्हा न्यायालयाने या प्रकरणात आसारामला आयुष्यभरासाठी आजन्म कारावास (Life Sentence till natural death) आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. त्यामुळे सध्या आसारामवर दोन प्रकरणांत शिक्षा झाली असून तो जोधपूर सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत आहे.
ही बातमी वाचा:























