ब्लॉग: शाबास ओमराजे! शिवछत्रपती आज असते तर तुम्हांस...

शाबास ओमराजे !!
शिवछत्रपती असते तर तुम्हांस रायगडी पालखीचा मान देवोन, सोनियाचे कडे घालोन सत्कार केला असता. शिवछत्रपतींच्या तत्वाचे आचरण तुम्ही करत आहात, रयतेच्या संकटसमयी दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन धीर देऊन मदत करायचे, तैसेच कार्य... तुम्ही करत आहात. सांप्रत समयी तुमचे पुण्यकार्य देखोंन दस्तुरखुद्द शिवछत्रपती स्वर्गातून बोलिले असतील, शाबास ओमराजे, शाबास !!
शाबास ओमराजे, शाबास !!
अनेक आमदार, खासदार, मंत्री सुद्धा मदत करत असतात, तर काही फक्त फोटोसेशन पुरतेही प्रकटतात. तुम्ही तर रौद्ररूप धारण केलेल्या नद्यांच्या प्रलंयकारी प्रवाहात, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) जवानांच्यासोबत छातीएवढ्या पाण्यात, रयतेस वाचविण्यासाठी शिकस्त करताना उभ्या देशाने बघितले, ओमराजे हे सोपं नाही. बिळांमध्ये पाणी गेल्यामुळे खवळलेले विषारी साप व मगरीसुद्धा प्रवाहात असतात, ओमराजे ! असहाय्य रयतेस वाचविताना आपल्या पायास साप चावला किंवा मगरीने चावा घेतला तर? किंवा रौद्र प्रवाहात भले भले पट्टीचे पोहणारे सुद्धा गाळात फसून, भोवर्यात बुडुन मेल्याचे कैक उदाहरणे असताना क्षणभर तुम्हांस, तुमच्या मातोश्री आनंदीदेवी, अर्धांगिनी संयोजिनी, बंधू जयराजे, पुत्र रघुवीर तथा पुत्री गायत्री, याद आले नसतील का? याद आले असतीलच. परंतु, त्याहीपेक्षा निवडणुकीवेळी तुम्ही रयतेला दिलेला शब्द तुम्हास याद आला की, "मी तुमचा मुलगा...भाऊ आहे, कुटुंबीय आहे. रयतेच्या पायात काटा मोडला तर तुमच्या डोळ्यात पाणी यावं, रयतेशी एवढा कुटुंबवत एकरूप जाहलेला मऱ्हाठी भूमीवरील लोकप्रतिनिधी देखोन आम्ही बहुत संतुष्ट जाहलो.
ओमराजे, तुमचे राजेनिंबाळकर घराणे, तरीही गर्व, अहंकार नाहीच. परंतु जमिनीशी नाळ जुळलेली, तत्त्वाशी, भगव्याशी व रयतेशी ईमान ठेवताय. म्हणून मान मिळतोय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमीच म्हणायचे, "कोणत्याही संकटावेळी जीवाची पर्वा न करता सर्वप्रथम धावून जातो तो शिवसैनिक". शिवसेनाप्रमुख सुद्धा स्वर्गातून बघत असतील तर त्यांनाही आनंदच जाहला असेल. योगासन, सायकलिंग, रनिंग करुन शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असणारे खासदार म्हणून तुमचा नावलौकिक आहेच. भारतात बोटावर मोजण्याइतपत खासदार, फिजिकली फीट आहेत, परंतु वाघाचं काळीज हे उसने भेटत नाही, ते उपजत असावे लागते. तुमचे हे असामान्य शौर्य व धैर्य उभ्या महाराष्ट्राने अनुभवले आहे. परंडा तालुक्यातील वडनेरला पुरात एकाच कुटुंबातील एक आजी व 2 वर्षाचा मुलगा व 2 व्यक्ती, मध्यरात्री 2 पासून पूर्ण पाण्याने वेढले गेले, स्वतःच्या घरावर अन्न व पाण्याविना मदतीच्या अपेक्षेने अडकले. हे कळल्याबरोबर, ओमराजे तुम्ही केवढे कासावीस जाहलात. NDRF च्या जवांनाच्या मदतीने स्वतः या कार्यात सहभागी होऊन कुटुंबाला सुखरुपपणे बाहेर काढेपर्यंत तुम्ही अन्नपाणी घेतलेच नाही. परंडा तालुक्यातील लाखी गावातील लहान मुले बायाबापडे पुरात अडकल्याची खबर शिवसेना जिल्हाप्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील व मेघराज पाटील यांनी तुम्हास पहाटे 3 वाजता कळविली, तात्काळ तुम्ही जिल्हाधिकारी व नाशिकच्या लष्करी मुख्यालयात संपर्क साधून हेलिकॉप्टर मागविले, सर्वांची सुटका होईपर्यंत तुमचा डोळ्याला डोळा लागलाच नाही. तुम्ही कैक रात्री झोपलाच नाहीत !
माणसं काय...जनावरे अगदीच पीकासहित माती सुद्धा वाहुन गेलीय. डोळ्यामोहरं.. सर्व नेस्तनाबूत झाल्यावर रयतेची जाहलेली दशा बघून, ओमराजे तुम्हांस अन्नपाणी सुद्धा गोड लागत नाही हे आम्हास कळतेय. संसदेत सुद्धा रयतेच्या प्रश्नावर तुमचे पोटतिडकीने बोलणे आम्हास भावले होते. कोरोनामध्ये सुद्धा डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून लढणारा योद्धा म्हणून तुम्हास आम्ही पाहिले आहे. केंद्राच्या एका योजनेत खासदाराच्या शिफारस पत्रावर शेतकर्यांना मोफत विद्युत रोहित्र देण्याची योजना निघाली तेंव्हा समोरचा व्यक्ती तुमच्या विरोधातील पक्षाचा, किंबहुना तुमच्या विरोधात काम केलेला असल्याची माहिती असताना सुद्धा तुम्ही फक्त "शेतकरी" अन्नदाता म्हणून, रयत नावाची ही एकच जात बघितली. अशा शेकडो शेतकर्यांना ही शिफारस पत्रे दिलीत. निवडणुकी पुरतेच राजकारण....बाकी रयत कोणत्याही पक्षाची असो! कोणत्याही जात धर्माची असो ! त्यांची कामे करायचीच.
रात्री बेरात्री एका कॉलवर अतिसामान्य, अगदी अनोळखी माणसालाही तुम्ही उपलब्ध असणे. त्यांच्या सुखदुःखात सहभागी असणे ही तुमची खासियत. राजकारणी होणे सोपं. परंतु दीपस्तंभ होणं सोपं नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी तुम्हास दूरध्वनीद्वारे शाबासकीची थाप देणे अप्रूप नाही. परंतु, मनसेच्या बाळा नांदगावकरांनी तर महाराष्ट्राचा कोहिनूर संबोधून लेखच लिहिला. एवढेच काय, सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते सुद्धा तुमचे चाहते झाले आहेत. ओमराजे, लोकप्रतिनिधी कैसा असावा? तर तुमच्यासारखाच. राजकारणी होण्याचे इच्छुक असलेल्या व सद्यस्थितीत राजकारणी असलेल्या सर्वांचे दीपस्तंभ जाहलात.
ओम राजे !
सरते शेवटी एकच सांगेल, रयतेसाठी खूप खस्ता खाता, त्यांची अहोरात्र सेवा करता, वेळेवर भोजन नाही, ऐसीयास दगदग बहुत होते, पुरेशी झोप नाही, तेंव्हा स्वतःच्या प्रकृतीचीही काळजी घ्या. दीर्घायुषी जगा!
लेखक - शिवरत्न शेटे
शिवव्याख्याते/दुर्गभ्रमंतीकार

























