दक्षिणेतून स्तंभ हातात घेऊन टोळी येते आणि सदनात चक्कर टाकून त्याठिकाणी तो स्तंभ स्थिर करते, हा निर्णय कुणी घेतला याची चर्चा होत नाही : शरद पवार
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात भारताचे संविधान आणि संसदीय लोकशाहीपुढील आव्हानं यावर भाष्य केलं.

पुणे : पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटरच उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव हे देखील कार्यक्रमाला उपस्थित आहेत. भारतीय संविधान, संसदीय लोकशाही पुढील आव्हाने या विषयावर शरद पवार उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी शरद पवार यांनी भारताच्या संविधान निर्मितीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं भाक्रा नांगल धरण निर्मिती आणि जलविद्युत प्रकल्पांसंदर्भातील योगदान शरद पवार यांनी मांडलं. भारताच्या शेजारी अस्थिरता असताना आपला देश वेगळ्या दिशेनं जातोय, याचं श्रेय संविधानाचं आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं. सध्या संवादाचा आणि चर्चेचा अभाव असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. संसदेची नवी वास्तू उभारण्याचा निर्णय घेताना चर्चा झाली नाही. त्यानंतर संसदेत स्तंभ लावण्याचा निर्णय घेताना देखील चर्चा झाली, असं शरद पवार यांनी म्हटलं. यासाठी शरद पवारांनी एक उदाहरण दिलं.
शरद पवार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटरचे उद्घाटन होत आहे, याचा मला अभिमान आहे. हे सेंटर पुण्यात होत आहे, आपण अपेक्षा करूया सेंटरच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिशा दिली, त्यासंदर्भात एकंदर अशी स्थिती, आव्हाने यासंदर्भात विचार विनिमय करणारे केंद्र होईल. नव्या पिढीला प्रोत्साहित करून, लिखित स्वरूपामध्ये त्यांनी आपल्यासमोर त्यांची भूमिका ठेवावी, यासाठी उपयुक्त होईल. त्यादृष्टीने जयदेव गायकवाड यांनी हा उपक्रम हाती घेतला. तो माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे, असं शरद पवार म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव निघाल्यावर सर्वसामान्य माणूस कटाक्षाने संविधानाचा उल्लेख करतो. ही गोष्ट खरी आहे, हा देश एकसंघ राहिला.. काही आव्हाने आहेत... काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत. त्यासाठी वेळप्रसंगी संसदीय साधनांचा आधार घेऊन भूमिका मांडण्याचा प्रयत्न होत आहे. पण ही गोष्ट मान्य करायला पाहिजे आजपर्यंत हा देश एकत्र आहे, तो एकसंध ठेवण्यासाठी संविधानाचे योगदान प्रचंड आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान विसरता येणार नाही : शरद पवार
आपला देश आणि देशाचा नकाशा नजरेसमोर ठेवला तर आजुबाजूला काय चाललेलं आहे. एका बाजूला पाकिस्तान येथे अस्थिरता आहे. नेपाळ सारखा देश शांतताप्रिय आणि भारताचा मित्र म्हणून ओळखला जातो. तिथे परिस्थिती एकदम बदलेली आहे. ज्या बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी या देशातल्या जनतेनं मोठी किंमत दिली त्या बांगलादेशमध्ये अस्थिरता आहे. श्रीलंकेत राज्य परिवर्तन अलीकडच्या काळात सतत होत आहेत. भारताच्या भोवती अस्थिरता आणि अस्वस्थता आहे. असे असताना भारत मात्र वेगळ्या दिशेने जात आहे. याचे 100 टक्के श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तुम्हाला आम्हाला दिलं त्यामुळं भारताची स्थिती तुलनात्मक दृष्ट्या इतरांच्या पेक्षा अधिक वेगळी आहे. त्याच्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान कधी विसरु शकत नाही, असं शरद पवार म्हणाले.
आजचा विषय आहे भारतीय संविधान, संसदीय लोकशाही पुढील आव्हाने हा आहे. आज भारतीय संसद ही महत्वाचे योगदान देत आहे. संसदेत अनेक लोक भूमिका मांडत असतात. ही भूमिका मांडत असताना फार मोठा वर्ग असा आहे, ज्याची स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यावर प्रचंड निष्ठा आहे. परंतु, या आवारात चिंता वाटणारी असे चित्र दिसतं. अनेक निर्णय असे काही घेतले जातात निर्णय घेण्याचं व्यासपीठ आहे, त्या व्यासपीठाला बाजूला ठेवलं जातं. तुम्ही सगळ्यांनी उभ्या आयुष्यात संसदेचं चित्र पाहिलेलं आहे.
दक्षिणेतून स्तंभ हातात घेऊन टोळी येते
मी स्वत: अनेक वर्ष संसदेत आहे. तिथे निर्णय घेताना चर्चा केली जाते. आजच्या राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन पाहता चर्चा करण्यावर विश्वास आहे की नाही अशी शंका येते. त्याचे साधं उदाहरण म्हणजे भारताची लोकसभा अनेक वर्षे त्याठिकाणी अनेक धोरणे झाली नीती ठरवली गेली. एके दिवशी आम्हाला संसदेत कळले की नवीन वास्तू होत आहे. ती नवी वास्तू झाली न त्याची चर्चा किंवा सुसंवाद झाला नाही आणि झाल्यानंतर एके दिवशी तुम्हाला मला पाहायला मिळतं कुणीतरी दक्षिणेतून स्तंभ हातात घेऊन टोळी येते आणि सदनात चक्कर टाकून त्याठिकाणी तो स्तंभ स्थिर करण्याचे काम होते. काय पार्लमेंटचा संबंध, कुणी निर्णय घेतला आणि कशासाठी घेतला याची चर्चा नाही, असं शरद पवार म्हणाले.
संविधानावर आमचा विश्वास आहे हे दाखवण्यासाठी सभागृहात संविधानाची प्रत ठेवायची त्याच्यासमोर डोके टेकवून आता देशातील लोकशाही पद्धती जतन करण्याबद्दलची आपल्यावरची जबाबदारी आहे त्यातून आपण मुक्त झालो आहे, असा विचार करणारे आजचे राज्यकर्ते आहेत, अशी टीका शरद पवार यांनी केली.
आव्हाने अनेक आहेत. त्याच्या खोलात जात नाही. हे जे सेंटर होत आहे, त्याचा केंद्रबिंदू बाबासाहेब आंबेडकर आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या संबंधानं दिलेलं योगदान जसं महत्त्वाच आहे. तसंच हा देश उभा करण्यासाठी आणि शक्तिशाली होण्यासाठी, मूलभूत प्रश्नाची सोडवणूक कशी होईल, यादृष्टीनं अनेक निर्णय बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतले.
स्वातंत्र्याच्या आधी केंद्रात सर्वपक्षीय सरकार जवाहरलाल नेहरु यांच्या नेतृत्त्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महत्त्वाची कामगिरी करणारे मंत्री होते. बळीराजा समृद्ध झाला पाहिजे, भूकेचा प्रश्न सोडवण्यासाठी असलेले निर्णय कृतीत आणण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला. शेती कसा संपन्न कशी करता येईल याचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. भाक्रा नांगल या निर्णयाची पूर्ण तयारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यापूर्वी मंत्रिमंडळात असताना केलेली, असं शरद पवार यांनी सांगितलं.
बाबासाहेब साहेब यांचे लिखाण अनेक दृष्टीने प्रसिद्ध आहे. माझ्याकडे राज्याची सूत्रे असताना मी दोन गोष्टी केल्या. बाबासाहेब यांच्या लिखाणावर ग्रंथ प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. मी सत्तेत असेपर्यंत 9 ग्रंथ प्रसिद्ध झाले. तसेच काम महात्मा फुले यांचे प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. याची सगळ्या दृष्टीने चर्चा होण्याची आवश्यकता आहे, असं शरद पवार म्हणाले.
अलीकडच्या काळात सरकारच्या ग्रंथ प्रदर्शन होतात. एके ठिकाणी सरकारच्या वतीने होते. मी एक ग्रंथ प्रदर्शनाला गेलो, तिथे आंबेडकर, फुले यांच्या अनेक ग्रंथांचे लिखाण त्या ठिकाणी बघायला मिळेल असे वाटले. कुठेतरी त्यांचे एक दोन ग्रंथ बघायला मिळाली. तिथं बंच ऑफ थॉटस पाहायला मिळालं, तिथे गोळवलकर गुरुजी यांचे लिखाण आणि कामावरची पुस्तके तिथे होती. सत्ता ज्यांच्या हातात आहे, वास्तवावर आधारित समस्येचा पुरस्कार करणारी लिखाण कितपत समोर येईल याची खात्री देता येत नाही, असं शरद पवार म्हणाले.
























