Pegasus Spyware : 'पेगॅसस'चा हल्ला आणीबाणीपेक्षा भयंकर, याचे खरे बाप आपल्याच देशात, शिवसेनेचा हल्लाबोल
'पेगॅसस'चा हल्ला हा आणीबाणीपेक्षा भयंकर आहे. 'पेगॅसस'चे खरे बाप आपल्याच देशात आहेत, त्यांना शोधा, अशा शब्दात शिवसेनेनं मोदी सरकारवर टीका केली आहे.
![Pegasus Spyware : 'पेगॅसस'चा हल्ला आणीबाणीपेक्षा भयंकर, याचे खरे बाप आपल्याच देशात, शिवसेनेचा हल्लाबोल Shiv Sena Allegation on Modi Sarkar Bjp pegasus spyware issue Pegasus Spyware : 'पेगॅसस'चा हल्ला आणीबाणीपेक्षा भयंकर, याचे खरे बाप आपल्याच देशात, शिवसेनेचा हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/21/8069929a1972da6164a99e56e7273abf_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : 'पेगॅसस'वरुन विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचा भडिमार केला आहे. यातच संसदेत देखील या मुद्द्यावरुन आवाज उठवला जात आहे. अशात शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल केला आहे. मूठभर लोक आणीबाणी लादल्याचा काळा दिवस प्रतिवर्षी साजरा करत असतात. 'पेगॅसस'चा हल्ला हा आणीबाणीपेक्षा भयंकर आहे. 'पेगॅसस'चे खरे बाप आपल्याच देशात आहेत, त्यांना शोधा, अशा शब्दात शिवसेनेनं मोदी सरकारवर टीका केली आहे.
शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, इस्राएल भारताचा मित्र देश असल्याचं आपण समजत होतो. पंतप्रधान मोदी यांच्या काळात ही मैत्री जरा जास्तच घट्ट झाली. त्याच इस्राएलच्या ‘पेगॅसस’ या हेरगिरी करणाऱ्या ऍप्सने आपल्याकडील दीड हजारांवर प्रमुख लोकांचे फोन चोरून ऐकल्याचं प्रकरण समोर आलं आहे. राहुल गांधी यांच्यासह अनेक उद्योगपती, राजकारणी, पत्रकार अशा लोकांचे ‘फोन टॅप’ करण्यात आले. व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या अधिकारावर हा सरळ हल्ला आहे, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
अग्रलेखात म्हटलं आहे की, संसदेचं अधिवेशन सुरू होत असताना हे पेगॅसस फोन टॅपिंगचं प्रकरण समोर आलं. हा सरळ सरळ हेरगिरी करण्याचाच प्रकार आहे. जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीत हे घडलं. आपले गृहमंत्री शाह सांगतात, ‘‘देशाला आणि लोकशाहीला बदनाम करण्याचं हे आंतरराष्ट्रीय कारस्थान आहे!’’ गृहमंत्र्यांनी हे विधान करावं हे आश्चर्यच आहे. देशाला बदनाम नक्की कोण करीत आहे, हे गृहमंत्री सांगू शकतील काय? सरकार तुमचं, देश आणि लोकशाही तुमची. मग हे सर्व करण्याची हिंमत कोणात निर्माण झाली आहे?, असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.
सामनात म्हटलं आहे की, पंतप्रधान, गृहमंत्री यांना हेरगिरी प्रकरणात जबाबदार धरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी संसदेत करणारे लोक आज सत्तेत आहेत व या प्रकरणावर ते संसदेत चर्चाही करायला तयार नाहीत. काही हजार लोकांच्या मोबाईल फोनमध्ये एक ‘अॅप’ सोडलं. फोन हॅक केले व या सगळ्या प्रमुख लोकांचं संभाषण ऐकण्यात आलं. ‘पेगॅसस’ हा निवडक भारतीयांवर झालेला सायबर हल्ला आहे व केंद्र सरकारच्या संमतीशिवाय असा हल्ला होऊ शकत नाही, असा आरोप शिवसेनेनं केला आहे.
लेखामध्ये लिहिलं आहे की, राहुल गांधी वापरत असलेले दोन मोबाईल फोन ‘पेगॅसस प्रोजेक्ट’च्या यादीत आहेत. अशोक लवासा हे निवडणूक आयुक्त पेगॅससचे लक्ष्य झाले. याच लवासा यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांनी प्रचारात आचारसंहितेचा भंग केल्याचं मत व्यक्त केलं होतं. प्रशांत किशोर, अभिषेक बॅनर्जी सध्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचेही फोन चोरून ऐकण्याचा प्रयत्न झाला आहे. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर ज्या महिला कर्मचाऱ्याने लैंगिक शोषणाचे आरोप केले त्या महिलेचा फोनही पेगॅसस हेरगिरी यादीत टाकण्यात आला. प्रश्न इतकाच आहे की, राजकीय शत्रूंवर पाळत ठेवण्यासाठी पेगॅससची सेवा भारतात कोणी विकत घेतली होती?, असा प्रश्न शिवसेनेनं केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)