लग्झरी कारने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटोसेशन करतील; उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यावरून उदय सामंतांची टीका
Uday Samant On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावर शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. उध्दव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांच्या बांधावरील दौरे कसे असतात याचे "प्रवासवर्णन" असे म्हणत ठाकरे यांच्या दौऱ्याला लक्झरीयस दौरा आणि इव्हेंट असे म्हणत उदय सामंत यांनी टीकास्त्र सोडले आहे. उदय सामंत यांनी एक पत्र लिहून उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर उपरोधात्मक टीका केली आहे.
उद्धव ठाकरे हे आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. औरंगाबादमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांची उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत. मात्र ठाकरेंच्या या दौऱ्यावर उदय सामंत यांनी टीका केलीय. "सत्ता गेल्यानंतरचा उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा आहे. ते मातोश्रीतून बाहेर पडून आपल्या लग्झरी कारमध्ये बसून नंतर प्रायव्हेट चार्टर्ड विमानाने संभाजीनगरला पोहचतील. दौऱ्यानिमित्त लार्जर दॅन लाईफ अशी प्रतिमा उद्धव ठाकरेंची दिसली पाहिजे याची काळजी त्यांचे फोटोग्राफर इव्हेंट करताना घेतील अशी खोचक टीका उदय सामंत यांनी केली आहे.
काय म्हटले आहे पत्रात?
" उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख दोन तासांसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत असे समजते. सत्ता गेल्यानंतरचा शेतकऱ्यांसाठीचा हा त्यांचा पहिला दौरा. लग्झरी कारने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते फोटोसेशन करतील. या संपूर्ण दौऱ्यात त्यांच्यासोबत कानात खुसफुसणारे, कायम त्यांच्या मागे पुढे नाचणारे, शेतीचे पूर्ण ज्ञान नसलेले, शेतकऱ्यांबाबत शून्य कळकळ असलेले सर्व बडवे सोबत असतील. हे बडवे शेतकऱ्यांना उद्धव ठाकरेंच्या जवळ येणे सोडाच बोलू देखील देणार नाहीत. स्वत:चं महत्त्व वाढवण्यासाठी शेतकऱ्यांच्या सर्व समस्या हे बडवेच उद्धव ठाकरे यांना सांगतील, अशी टीका या पत्रातून उदय सामंत यांनी केली आहे.
केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी केलेल्या या लक्झरीय दौऱ्यात उद्धवजी स्वत:चा छंद जोपासून शेतकऱ्यांचे फोटो काढतील. त्यानंतर मुंबईत या फोटोंचे प्रदर्शन भरवून सेलिब्रिटींना आमंत्रण दिले जाईल. सेलिब्रिटी येतील प्रदर्शन पाहतील, उद्धवजींची फोटोग्राफी किती चांगली आहे याचे कौतुक करतील. त्यानंतर मातोश्रीवरील बडवे शेवसेना नेत्यांना व शिवसैनिकांना प्रदर्शनातील फोटोंची बोली लावून खरेदी करण्याचे आदेश देतील. परंतु, आदेश पाळणारे आणि वंदीन बाळासाहेबांचा विचार ह्दयात असणारे शिवसैनिक तिथे राहिले नाहीत याची सर्वांना जाणीव आहे. तुमचे शेतकऱ्यांच्या बांधावरचे दौरे नक्की कसे असतात हे आमच्यापेक्षा जास्त कुणाला माहिती नसेल म्हणऊन सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी तुमच्या दौऱ्याचे प्रवासवर्णन करत आहे, असा हल्लाबोल उदय सामंत यांनी पत्रातून केलाय.
बळीराजा हा आपल्या सर्वांचा अन्नदाता आहे.... pic.twitter.com/CCxWwkJH1j
— Uday Samant (@samant_uday) October 23, 2022