Sharad Pawar on Jayant Patil : जयंतरावांच्या हातामध्ये महाराष्ट्र पुढे नेण्याची जबाबदारी टाकतोय! शरद पवारांच्या इस्लामपुरातील भाषणाची चर्चा!
Sharad Pawar on Jayant Patil : इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जंगी सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. यात्रेची सांगता आणि प्रचाराचा शुभारंभ अशाच पद्धतीने या सभेकडे पाहिले जात होतं.
Sharad Pawar on Jayant Patil : महाविकास आघाडीमध्ये नेतृत्वावरून काँग्रेस आणि विशेषत: ठाकरे गटामध्ये रस्सीखेच सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (17 ऑक्टोबर) जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यातून एक प्रकारे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. गेल्या 24 दिवसांपासून सुरु असलेली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य संंवाद यात्रेची सांगता जयंतरावांच्या बालेकिल्ल्यातून करण्यात आली. इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जंगी सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे यात्रेची सांगता आणि प्रचाराचा एकप्रकारे शुभारंभ अशाच पद्धतीने या सभेकडे पाहिले जात होतं. त्यामुळे या सभेमधून शरद पवार कोणता कानमंत्र देणार? याचीच चर्चा रंगली होती. मात्र शरद पवार यांनी थेट जयंतराव पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत एक प्रकारे ते महाराष्ट्राचे नेतृत्व करतील, असे सांगितले.
त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरला आहे का? अशीच चर्चा रंगली. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये मुख्यमंत्री पदावरून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्यात यावा अशी मागणी सातत्याने केली जात आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या मागणीला दुजोरा देत जो चेहरा जाहीर केला जाईल त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून मात्र भूमिका स्पष्ट करण्यात आली नव्हती. मात्र, आता शरद पवार यांनी जयंतरावांचं कौतुक करत एक प्रकारे चेहराच समोर आणला आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे सुद्धा महाराष्ट्राच्या महिला पहिल्या मुख्यमंत्री होऊ शकतात का? अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामधून केली जात होती. मात्र शरद पवार यांनी वेळ आली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आपला उमेदवार कोण असेल याबाबत आता स्पष्टपणे सांगितलं आहे.
काय म्हणाले शरद पवार? त्यांच्याच शब्दात...
सभेला संबोधित करताना जयंत पाटील म्हणाले की, मला एका गोष्टीचे आनंद आहे ते सगळे काम करण्यासाठी आज जयंतराव ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हिंडतायत, काम करतायेत, कष्ट करतायेत, लोकांना विश्वास देतायत, दिलासा देत आहेत त्यांच्या या प्रयत्नांच्या पाठीशी महाराष्ट्राची तरुण पिढी सामुदायिक पणाने एका विचाराने निश्चित उभी राहील आणि जे स्वप्न आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात महाराष्ट्राबद्दलचे आहे त्याची पूर्तता या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. हे काम एक ऐतिहासिक काम आहे आणि ज्या भागातील नेतृत्वाने स्वातंत्र्याच्या साठी एक इतिहास निर्माण केला मला आनंद आहे की आजच्या पिढीच्या जयंतरावसारख्या नेतृत्वाला उद्याचा महाराष्ट्र घडवण्याच्यासाठी, सावरण्यासाठी भूमिका आपल्या खांद्यावर घ्यावी ही तुमची, माझी आणि संपूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे.
उद्याचा प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी मोलाची कामगिरी याच परिसरातून होणार
त्या अपेक्षेच्या पूर्ततेला तुम्हा सगळ्यांची शक्ती असली पाहिजे. त्यांनी आत्ता सांगितलं त्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायचं आहे, विचार सांगायचे आहेत, दृष्टिकोन सांगायचा आहे, कसा महाराष्ट्र उभा करायचा? हे सांगायचं आहे आणि एक प्रत्यक्ष घडवायचे आणि हे करण्यासाठी त्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना आपले घर, आपला मतदारसंघ हे सांभाळण्याचे काम तुम्हा सर्वांना करावे लागेल. हे काम तुम्ही कराल याचा मला शंभर टक्के विश्वास आहे. या सगळ्या कामाला आम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. मी एवढच सांगतो पक्षाचा प्रमुख म्हणून सांगतो, देशाच्या पक्षाचा प्रमुख म्हणून सांगतो की उद्याचा महाराष्ट्र सावरण्याच्यासाठी आणि उद्याचा प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी मोलाची कामगिरी याच परिसरातून होणार आहे याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. कारण हे गाव मोठे ऐतिहासिक गाव आहे. या साखराळे गावामध्ये साखर कारखाना उभे करण्याचे काम राजाराम बापूंनी केलं होतं. याच गावामध्ये आज आपण जमतोय आणि याच भागातल्या सुपुत्राच्या हातामध्ये महाराष्ट्र उभारण्याची, महाराष्ट्र सावरण्याची आणि महाराष्ट्र पुढे नेण्याची ही जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकतोय. मी आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे आमचे सगळे सहकारी आणि महाराष्ट्राची तरुण पिढी शक्तीने त्यांच्या पाठीशी उभी राहील, हा दिलासा आणि हा विश्वास या ठिकाणी देतो.
इतर महत्वाच्या बातम्या