हा बडा नेता कोण? अंजली दमानियांचा सवाल; स्कॉर्पिओमधील 2 मोबाईल अन् व्हिडिओचा दाखला
संतोष देशमुख हत्याप्रकरणी तपास करणाऱ्या सीआयडी पथकाला स्कॉर्पियो गाडीमधे 2 मोबाईल मिळाले आहेत, त्याचा डेटा रिकव्हर करण्यात येत आहे.

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्याहत्याप्रकरणाने राज्यातील वातावरण संतप्त झाले असून बीड जिल्ह्यात याची धग पाहायला मिळत आहे. सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करा, अशी मागणी करत बीडमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला. तर, दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी देखील सत्यशोधक आंदोलन सुरू केलं असून बीडमधील (Beed) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसातून दोन तास त्या बसणार आहेत. या घटनेच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे असे म्हणत सुरुवातीपासूनच त्यांनी पाठपुरावा केला आहे. आता, पुन्हा एकदा ट्वटि करत दमानिया यांनी या प्रकरणात कोणत्या बड्या नेत्याला फोन करण्यात आले असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच, ह्या बड्या नेत्याचं नाव तत्काळ जाहीर करावं, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी तपास करणाऱ्या सीआयडी पथकाला स्कॉर्पियो गाडीमधे 2 मोबाईल मिळाले आहेत, त्याचा डेटा रिकव्हर करण्यात येत आहे. त्यामध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ आहेत. पण, एका बड्या नेत्याचा फोन गेला होता, हेदेखील आहे. कोण आहे हा बडा नेता, तत्काळ नाव जाहीर करा अशी मागणी अंजली दमानया यांनी केली आहे. दमानिया यांचं हे ट्विट पुन्हा चर्चेत आलं असून बीडमधील हत्याप्रकरणात बडा नेता कोण,पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
सीआयडीचे पथक बीडमध्ये, तपास सुरू
CID चे पोलीस अधीक्षक सचिन पाटील बीडमध्ये दाखल झाले असून बीड शहर पोलिसात CID चे पथक पोहचले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड पोलिसांकडून सीआयडी पथकाने माहिती घेत तपास चक्र फिरवली आहेत. त्यामध्ये फरार आरोपींनी फेकलेल्या मोबाईलमधील माहितीद्वारे CID पथक सध्या चौकशी करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. या मोबाईलद्वारे फरार आरोपींनी ज्या ज्या लोकांना संपर्क केला, त्यांची चौकशी पथकाद्वारे सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत शंभरहून जास्त लोकांची चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, या संदर्भात कोणीतही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याप्रकरणी, एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की संपर्कात असलेले सर्वच लोकं आरोपी आहेत असं म्हणता येऊ शकणार नाही. मात्र, बीड शहर पोलीस ठाण्यात सध्या CID पथकाकडून अधिक तपास सुरू आहे.
लोकशाही या माध्यमांने माझी आत्ता प्रतिक्रिया घेतली.
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 29, 2024
सीआयडी ला स्कॉर्पियो गाडी मधे २ मोबाईल मिळाले, त्याचा डेटा रिकवर करण्यात येत आहे, त्यामेधे संतोष देशमुख ना मारहाण करतानाचे वीडियो आहेत पण एका बड्या नेत्याचा फ़ोन गेला हे देखील आहे….
कोण आहे हा बडा नेता
तत्काळ नव जाहीर करा pic.twitter.com/l9XvT302st
हेही वाचा
नवी मुंबई विमानतळावर उतरलं पहिलं विमान; वॉटर सलामी, टाळ्या अन् आनंदी जल्लोष
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
