(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विधानसभा अध्यक्षांची जागा काँग्रेसचीच; तिनही पक्षांनी एकत्र निर्णय घ्यावा : शरद पवार
विधानसभा अध्यक्ष पदाची जागा ही काँग्रेसचीच आहे. तसेच यासंदर्भात तिनही पक्षांनी एकत्रित निर्णय घ्यावा, असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे.
मुंबई : मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तर काही प्रश्नांवर निर्णय घेण्याचा आग्रह असताना त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात राजकीय खलबतं झाल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष पदाची जागा ही काँग्रेसचीच आहे. तसेच यासंदर्भात तिनही पक्षांनी एकत्रित निर्णय घ्यावा, असा सल्लाही शरद पवार यांनी यावेळी दिला आहे. त्याचबरोबर यंदाच्या पावसाळी अधिवेशनात कृषी कायदा पटलावर येण्याची शक्यता कमी असल्याचे संकेतही शरद पवार यांनी दिली आहेत. कारण कृषी कायद्यात अनेकांनी काही बदल सुचवले आहेत.
शरद पवार बोलताना म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. पण पुढचा कार्यक्रम कसा करायचा याबाबत चर्चा झाली. असा आग्रह आहे की, काही प्रश्नांवर लवकरात लवकर निर्णय घेतले पाहिजेत. यासंदर्भात चर्चा झाली. कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही." तसेच पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, "विधानसभा अध्यक्षपदाची जागा ही काँग्रेसचीच जागा आहे. त्यामुळे त्यासंदर्भात कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो तिनही पक्षांनी एकत्र मिळून घ्यावा आणि त्या पदासाठी योग्य तो उमेदवार त्यांनी निवडावा."
कृषी कायद्यांवर बोलताना शरद पवार म्हणाले की, "दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात कृषी कायदा पटलावर येण्याची शक्यता कमीच आहे. पण आलचं तर मात्र सगळ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा लागेल." तसेच कृषी कायद्यांबाबत अनेकांनी काही बदल सुचवले आहेत. कृषी कायद्याबाबत राजू शेट्टी मागणी केली होती. तसेच महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माझ्याशी याबाबत चर्चा केली. केंद्र सरकारनं पारित केलेल्या तिनही कायद्यांबाबत अनेक तक्रारी आहेत. महाराष्ट्रात हे कायदे मंजूर करण्यासाठी जे आक्षेप आहेत. त्याबाबत चर्चा करावी हा संवाद त्यांनी सुरु केला आहे. याच तरतूदींबाबत सध्या चर्चा सुरु आहे."
दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, "सहा महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या वेशींवर आंदोलन करत आहेत. त्यांची भूमिका तीव्र आहे. ते आंदोलन मागे घ्यायलाही तयार नाहीत. त्यामुळे त्यांची संवाद साधून त्यावर तोडगा काढणं गरजेचं आहे. त्यांना खिजवणे योग्य नाही."
विरोधकांच्या आरोपांना त्याच ताकदीनं उत्तर देण्याची गरज, संजय राऊतांचं वक्तव्य; शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील भेटी-गाठीच्या सत्रावरुन बोलताना संजय राऊत म्हणाले की, "सर्वांना असं वाटतंय की, काहीतरी घडतंय, पण तंस काहीच नाही. तसेच भेटीतून वेगळे अर्थ काढावे असं काहीच मला होताना दिसत नाहीये. परवा शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक पार पडली, चर्चा झाली. विरोधी पक्षाकडून सध्या सत्ताधाऱ्यावर हल्ले सुरु आहेत. त्यातील अनेक हल्ले फुसके बार आहेत, हे आम्हालाही माहीत आहे. पण एकत्रितपणे त्याचा प्रतिकार करणं गरजेचं आहे. जो भ्रम निर्माण केला जातोय, जे आरोप केले जात आहेत, सातत्यानं. त्याला त्याच ताकदीनं उत्तर देण्याची गरज आता मला वाटतेय. म्हणूनच आता मुंबईला गेल्यावर मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची भेटून याबाबत काय करता येईल, हे ठरवणार आहे."