(Source: Poll of Polls)
Savarkar Gaurav Yatra : सावरकर गौरव यात्रेत मुख्यमंत्र्यांसह आशिष शेलारांचा मविआवर हल्लाबोल, भगव्या टोप्यांनी वेधलं लक्ष
स्वातंत्र्यवीरांचा अपमान हा देशाचा अपमान असून, राहुल गांधींचा मी धिक्कार करतो, सावरकरांचा त्याग, बलिदान विसरून अपमान होत आहे. ते प्रखर हिंदुत्ववादी होते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले
Savarkar Gaurav Yatra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज (2 एप्रिल) ठाणे शहरातून वीर सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ झाला. सावरकर यांच्या गौरवासाठी काढण्यात आलेल्या गौरव यात्रेत मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. भाजप आणि शिंदे गटाच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने गेल्या महिन्यात सावरकरांच्या दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या त्यांच्यावरील वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सावरकर गौरव यात्रा काढण्याची घोषणा केली होती.
भगव्या टोप्यांनी लक्ष वेधले
मी सावरकर संदेश असलेल्या भगव्या टोप्या घालून लोक गौरव यात्रेत सहभागी झाले होते. ठाणे शहरातील राम गणेश गडकरी रंगायतन सभागृहात मुख्यमंत्र्यांनी सावरकरांना पुष्पहार अर्पण केला. येथून यात्रा सुरु झाली. शिंदे यांच्यासह सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीचे नेतेही यात्रेत सहभागी झाले होते. रथ फुलांनी सजवण्यात आला होता आणि त्याच्या पाठोपाठ मोटारसायकलवरून समर्थक येत होते.
मुख्यमंत्र्यांनी शहरातील चार विधानसभा मतदारसंघातून फिरत अभिवादन केले. यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांवरही पुष्पवृष्टी करण्यात आली. या यात्रेत भाजप नेते डॉ.विनय सहस्रबुद्धे, ठाण्याचे आमदार संजय केळकर, ठाणे भाजपचे अध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे, माजी महापौर नरेश म्हस्के, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह सत्ताधारी आघाडीचे अनेक स्थानिक नेते सहभागी झाले होते. यात्रेत महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
दुसरीकडे, महाविकास आघाडीने छत्रपती संभाजीनगरमध्ये आज वज्रमुठ सभा आयोजित केली आहे. या रॅलीत उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक बडे नेते सहभागी होणार आहेत.
स्वातंत्र्यविरांचा अपमान हा देशाचा अपमान
यात्रेला प्रारंभ करताना मुख्यमंत्री म्हणाले की, सावरकर गौरव यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात पुढील आठवडाभर प्रत्येक गावात, शहरात ही यात्रा निघेल. सावकरांचा इतिहास घराघरात पोहोचवला जाईल. स्वातंत्र्यविरांचा अपमान हा देशाचा अपमान असून त्यामुळे राहुल गांधींचा मी धिक्कार करतो. सावरकरांचा त्याग, बलिदान विसरून अपमान होत आहे. ते प्रखर हिंदुत्ववादी होते, देशभक्त होते. एक दिवस तुम्ही सेल्युलरमध्ये राहू शकता का? अशी विचारणा त्यांनी केली. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, सावरकरांचा सातत्याने त्यांचा अपमान केला जात आहे. जाणून बुजून त्यांच्याविरोधात बोललं जात आहे. या लोकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी ही यात्रा काढली आहे. सावरकरांबद्दल एकही शब्द कोणी ऐकणार नाही, सहन करणार नाही, म्हणून ही गौरव यात्रा काढण्यात आली आहे. तसेच सावरकरांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी ही यात्रा भाजपा आणि शिवसेनेने काढली आहे. त्यांच्यावर प्रेम करणारे, त्यांचे अनुकरण करणाऱ्यांचं मी या यात्रेत स्वागत करतो.
आशिष शेलार यांचा हल्लाबोल
दरम्यान, यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही महाविकास आघाडीवर हल्ला चढवला. ते म्हणाले की, वज्रमूठ एका हाताची असते. एकत्र हात घेतला, तर तिथे चाचपडत चालतो. सावरकर यांचा अपमान वारंवार काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याकडून होत आहे. देशभक्तांचा अवमान होत आहे त्यामुळे देशभक्त कसे रस्त्यावर येतात हे पहा. सावरकर यांच्या विचारांवर चालायच असेल, तर ठाकरे यांनी काँग्रेस सोडावी असेही शेलार यावेळी म्हणाले. हिंमत आसेल तर उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांची माफी मागून घ्यावी.
छत्रपती संभाजीनगर शहरात गौरव यात्रेला परवानगी
दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर शहरात महाविकास आघाडीची एकत्र सभा होत असतानाच दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून सावरकर गौरव यात्रा (Savarkar Gaurav Yatra) काढण्यात येत आहे. मात्र पोलिसांकडून या यात्रेला परवानगी देण्यात आली नव्हती. आज सकाळी अखेर पोलिसांनी या यात्रेला परवानगी दिली आहे. परवानगी देताना पोलिसांकडून सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे सावरकर गौरव यात्रा काढताना भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेला पोलिसांकडून देण्यात आलेल्या अटी आणि शर्ती पाळाव्या लागणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या