एक्स्प्लोर
भव्य वाचनमंदिराने महाबळेश्वरचं खोरं समृद्ध, भिलार गावाची कहाणी

सातारा : कुठे शिवरायांचं भित्तीचित्रं, तर कुठे बालसाहित्याचे फलक. कुठे संत साहित्याचा वास, तर कुठे दिवाळी अंकांचा फराळ. एखाद्या साहित्य संमेलनात आल्याचा भास व्हावा. पण कायमस्वरुपी साहित्य संमेलन भरवणारं हे देशातलं पहिलं गाव आहे महाराष्ट्रात. सातारा जिल्ह्यातलं भिलार गाव. महाबळेश्वरच्या डोंगररांगा, स्ट्रॉबेरीसाठी सातारा ओळखलं जायचं, मात्र आता पुस्तकांच्या घरांसाठी ओळखलं जाईल. शिक्षणमंत्री विनोद तावडेंची ही संकल्पना. फंडा अगदी साधा सोपा. ज्या घराबाहेर जे चित्र, त्या विषयाची पुस्तके त्या घरात. या, बसा आणि मनसोक्त वाचा. भिलार गावातली 25 घरं निवडण्यात आली. प्रत्येक घरात 600 पुस्तकं. ही पुस्तकं सर्वांसाठी वाचनाला खुली. सरकारच्या या उपक्रमासाठी गावकरीही सरसावले. कोणी घरातला जिना बाहेर काढला, तर कोणी ऑफिस रिकामं करुन दिलं. या उपक्रमानं गावकऱ्यांना वाचनाची अशी काही गोडी लागली, की सगळं गाव मिळेल ते पुस्तक वाचू लागलं. वाचनसंस्कृती लोप पावत असल्याची ओरड करणाऱ्यांना भिलार हे चांगलं उत्तर आहे. आपल्या देशात मंदिरांपेक्षा वाचनालयांची गरज जास्त आहे असं म्हणतात. त्यामुळे प्रत्येक गावानं भिलारसारखी वाचनमंदिरं गावात उभी करण्याची गरज आहे.
आणखी वाचा























