Sant Muktai Palkhi : मुक्ताईनगरहून संत मुक्ताईच्या पालखीचं जयघोषात पंढरीकडे प्रस्थान
Ashadhi Wari 2022 : आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरला सात संतांच्या मानाच्या पालख्या दाखल होत असतात. यातील स्त्री संत म्हणून संत मुक्ताई (Sant Muktai Palkhi )पालखीचं एक वेगळं महत्व आहे.
Ashadhi Wari 2022 : वारकरी संप्रदायात महत्वाचे स्थान असलेल्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई पालखीचे जयघोषात मोठ्या उत्साहाने पंढरपूरकडे (Pandharpur Ashadhi wari news) प्रस्थान झाले. आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्ताने पंढरपूरसाठी सात संतांच्या मानाच्या पालख्या दाखल होत असतात. यातील स्त्री संत म्हणून संत मुक्ताई पालखीचं एक वेगळं महत्व आहे.
जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी या संत मुक्ताईच्या समाधी स्थळापासून या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान केलं. यावेळी सातशे किलोमीटर पायी प्रवास करीत हजारो वारकरी यामध्ये पंढरपूरकडे दर्शनासाठी वारीमध्ये सहभागी होणार आहेत.
आज पहाटेपासूनच पालखी प्रस्थान सोहळ्याची विधिवत जय्यत तयारी करण्यात आली होती. यावेळी दर्शनासाठी मोठ्या संख्येने वारकरी संत मुक्ताई समाधीस्थळी दाखल झाले होते. यावेळी भजन कीर्तन जयघोषासह टाळकऱ्यांनी टाळांच्या गजरात विविध प्रात्यक्षिके दाखवत आपली सेवा बजावली आहे.
दोन वर्ष कोरोनामुळे पालखी सोहळ्यावर काही निर्बंध घालण्यात आले. मात्र तरीही मर्यादित वारकऱ्यांमध्ये ही पालखी पंढरपूरकडे रवाना झाली होती. तीन शतकाहून अधिक काळापासून संत मुक्ताईची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करण्याची परंपरा आहे. त्या परंपरेनुसार आज पालखी पंढरपूरकडे रवाना झाली.
पालखी सोहळ्याच्या पूजनप्रसंगी खासदार रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, मंदिर संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि वारकरी उपस्थित होते. टाळ मृदुंग आणि मुक्ताईच्या जयघोषात मोठया उत्साहात आणि भक्ती भावाने पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे.