Nashik Nivruttinath Dindi : भेटी लागे जीवा! 27 दिवसांचा पायी प्रवास, अन विठुरायाचं दर्शन
Nashik Nivruttinath Dindi : संतश्रेष्ठ निवृतीनाथ महाराज यांची पायी दिंडी 13 जून रोजी पंढरपूरला प्रस्थान करणार आहे. एकूण 27 दिवस दिंडीचालक पायी प्रवास करणार आहेत.
Nashik Nivruttinath Dindi : दोन वर्षांच्या खंडानंतर आता संत निवृत्तीनाथ पालखी (Sant Nivruttinath Palkhi) यंदा विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार आहे. यासाठी संत निवृत्तीनाथ महाराज दिंडीचे वेळापत्रक ठरले असून 13 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. आळंदी येथून संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे प्रस्थान 21 जूनला तर संत तुकारामांच्या पालखीचे प्रस्थान 20 जूनला होणार आहे.
मुखी हरिनामाचा गाजर, हाती टाळ मृदूंग घेत लाखो वारकरी आषाढी वारीला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला पायी जात असतात. पण गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा फटका पिढ्यान्-पिढ्या सुरू असलेल्या वारीला सुद्धा बसला. अन दोन वर्ष वारकरी आणि विठ्ठलाची भेटच झाली नाही. वारीवर या काळात अनेक निर्बंध घालण्यात आले होते. पण आता सर्व वारक-यांना विठ्ठलाची भेट घेता येणार आहे. यंदाची वारी ही कोरोना निर्बंधमुक्त असल्याने मनसोक्त विठुरायाचे पाहता येणार आहे.
त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी नित्यनेमाने पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी जात असते. दोन वर्षाच्या कालखंडानंतर यंदाच्या वारीसाठी भाविक भक्त उत्सुक आहेत. या पार्श्वभूमीवर संत निवृत्तिनाथ महाराज दिंडीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. संत निवृत्तिनाथ महाराज दिंडी चांदीच्या रथासह 13 जूनला पंढरपूरकडे रवाना होणार आहे. पंढरपुरात 09 जुलैला संत निवृत्तीनाथांची पालखी पोहोचेल. त्र्यंंबकेश्वर ते पंढरपूर पायी अंतर जवळपास 450 किलामीटर आहे. पालखीला जाऊन-येऊन असा एकूण 49 दिवसांचा कालावधी लागणार आहे.
असा होतो प्रवास
दिंडीतील वारकरी मंडळी रोज दिवसा वीस किलोमीटर पायी प्रवास करतात. तर वेळापत्रका प्रमाणे रात्री नियोजित असलेल्या ठिकाणी मुक्काम करत दिंडी सत्ताविसाव्या दिवशी पंढरपुरात पोहोचते. या दरम्यान चार मुक्कामानंतर पंढरपूर वारी करून पालखी त्र्यंबकेश्वरकडे माघारी येईल. 18 दिवसांचा पायी प्रवास करून 30 जुलैला पालखी त्र्यंबकेश्वरमध्ये परत दाखल होईल. त्र्यंबकेश्वर, सातपूर, नाशिक, पळसे, लोणारवाडी, खंबाळे, पारेगाव, गोगलगाव, राजुरी, बेलापूर, राहुरी, डोंगरगन, अहमदनगर, साकत, घोगरगाव मिरजगाव, चिंचोली (काळदाते) कर्जत, कोरेगाव, रावगाव, जेऊर, कंदर, दगडी अकोले, करकंब, पांढरीवाडी, चिंचोली, पंढरपूर.असा पायी दिंडीचा मार्ग असणार आहे.
दोन वर्षानंतर विठू माऊलीशी गळाभेट
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता भाविकांना आषाढी वारीचे वेध लागले आहेत. मागील दोन वर्ष निवृत्तीनाथांची दिंडी बसने पंढरपूरला जात होती. मात्र यंदा सर्वच वारकर्यांना विठुरायाचे दर्शन होणार आहे. आषाढी एकादशीला राज्यभरातून दिंड्याचे आगमन होते. मात्र त्र्यंबकेश्वर येथील संतनिवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीला प्रमुख स्थान आहे.