मोठी बातमी : संजय शिरसाट राज ठाकरेंच्या भेटीला, तब्बल तासभर चर्चा; युतीची काय चर्चा झाली?
Raj Thackeray Sanjay Shirsat Meeting : राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर ही भेट झाली असून, दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली आहे.
Raj Thackeray Sanjay Shirsat Meeting : मागील काही दिवसांपासून राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) महायुतीसोबतच्या युतीच्या चर्चांना ब्रेक लागले असतानाच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर ही भेट झाली असून, दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे या बैठकीत राजकीय चर्चा झाली असून, युतीबाबत देखील चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, राज ठाकरेंच्या भेटीत कोणतेही राजकीय चर्चा झाली नसल्याचं शिरसाट म्हणाले आहेत.
मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि महायुतीमधील नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या भेटीनंतर आता राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी दिल्ली दौरा करत थेट अमित शाहांची देखील भेट घेतली होती. मात्र, मागील आठवड्यापासून ही चर्चा थांबली असतानाच, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट थेट राज ठाकरेंच्या भेटीला पोहचले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे महायुतीत दाखल होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
थोडीफार राजकीय चर्चा होत असते : शिरसाट
दरम्यान राज ठाकरेंच्या भेटीनंतर 'एबीपी माझा'ला प्रतिक्रिया देतांना शिरसाट म्हणाले की, “राज ठाकरेंचे आणि आमचे आधीपासूनच एक वेगळे संबंध आहे. शिवसेनाप्रमुखांच्या मराठवाड्यात जेव्हा सभा व्हायच्या, त्यावेळी राज ठाकरे आवर्जून बाळासाहेबांच्या सोबत असायचे. शिवसेनाप्रमुख म्हणायचे मनभेद नसायला पाहिजे, त्याप्रमाणे त्यांचाही आणि आमचाही कुठेही मनभेद नाही. फार दिवसांची इच्छा होती राज ठाकरेंना भेटायची, त्यांच्यासोबत गप्पा मारायची, त्यामुळे यात कोणत्याही राजकीय गप्पा झाल्या नाही. थोडीफार राजकीय चर्चा होत असते. परंतु आता पुढे काय करायला पाहिजे, यांनी काय करायला हवे याबाबत चर्चा झाली नाही. जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम आम्ही केलं असे शिरसाट म्हणाले.
तुमच्यासाठी रेड कार्पेट टाकणारे आम्ही असणार...
आजच्या बैठकीत मी कोणताही प्रस्ताव वगैरे आणलेला नाही. असे प्रस्तावाचे काम वरिष्ठ पातळीवर होतात. माझ्यासारख्या मार्फत एखादा प्रस्ताव जाईल याची कल्पना देखील करू शकत नाही. आजच्या भेटीत फक्त चहा आणि जुन्या आठवणींवर गप्पा झाल्या. तसेच राज ठाकरे यांना मी पहिल्यापासून सांगतो साहेब तुम्ही यायला पाहिजे. तुमच्यासाठी रेड कार्पेट टाकणारे आम्ही असणार आहोत. राज ठाकरे आमच्या सोबत आल्यास नक्कीच महायुतीला याचा फायदा होणार आहे. महायुतीची आणखी ताकद वाढेल आणि जागा निवडून येतील असे शिरसाट म्हणाले.
राज ठाकरेंचा सध्या सर्व लक्ष मेळाव्यावर
दरम्यान राज ठाकरे यांचं सध्या सर्व लक्ष त्यांच्या मेळाव्यावर आहे. माझी जी काही मळमळ आहे, ती मी माझ्या मेळाव्यात काढेल. त्या मेळाव्यात मी बोललेच मात्र त्यानंतर मी निर्णय घेईल असे राज ठाकरेंची भूमिका असल्याचं संजय शिरसाट म्हणाले. आमच्या सोबत येण्याबाबत राज ठाकरेंच्या मनात आज काय आहे, याबाबत मी सांगू शकत नाही, मात्र त्यांनी यावं असे देखील संजय शिरसाट म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :
श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर, आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांची भूमिका काय?