Neelam Gorhe : साहित्य संमेलनाच्या सदस्यांना 50 लाख, आयोजकांना एक मर्सिडीज दिल्याची चर्चा; नीलम गोऱ्हेंच्या आरोपांवर संजय राऊतांचा मिश्कील टोला
Sanjay Raut Letter : काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा गैरवापर केला, त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे का असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे.

मुंबई : शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून ठाकरेंवर आरोप केल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाल्याचं दिसून येतंय. काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला. तसेच आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे काय? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. तर आरोप करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी संमेलनात सहभागी होण्यासाठी सदस्यांना 50 लाख तर आयोजकांना एक मर्सिडीज दिल्याची चर्चा बाहेर सुरू असल्याचा टोलाही राऊतांनी लगावला. संजय राऊत यांनी आखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना खुलं पत्र लिहित नाराजी व्यक्त केली.
निलम गोऱ्हेंच्या मर्सिडीजच्या आरोपांवर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. संजय राऊतांनी संमेलनाचे संयोजक संजय नहार यांना फोन करून नाराजी व्यक्त केली. त्यावर राजकारणासाठी साहित्य संमेलन मंचाचा वापर टाळला पाहिजे, अशी प्रतिक्रिया संमेलनाचे संयोजक संजय नहार यांनी दिली आहे.
नीलम गोऱ्हे यांचा आरोप काय?
दिल्लीत 98 वे आखिल भारतीय साहित्य संमेलन सुरु आहे. मराठी साहित्य संमेलनात 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम वारंवार ठाकरेंना खोके दिल्याचा आरोप करतात, अशातच गोऱ्हेंनी देखील अशाच प्रकारचा गंभीर आरोप केला. दरम्यान त्यांच्या या आरोपांवर उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी देखील हल्लाबोल केला.
काय म्हटलंय संजय राऊतांच्या पत्रात?
दिल्लीतील साहित्य संमेलनात चर्चेत आलेले अनेक चर्चासत्र आणि परिसंवाद हे साहित्यबाह्य होते. एखाद्या राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली संमेलन व त्यातील कार्यक्रमांचे आयोजन झाले. साहित्य महामंडळाच्या परंपरेस हे शोभणारे नाही. या चर्चा-परिसंवादात काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला. तसेच आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे काय?
नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली. साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केले काय? सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे काय? नसेल तर महामंडळाने त्वरित माफी मागावी.
नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरून बाहेर पडताच तालकटोरा मैदानाबाहेर पत्रकारांना सांगितले की, "मी महामंडळाच्या सदस्यांना 50 लाख रुपये देऊन या कार्यक्रमात सहभागी झाले आणि उषा तांबे यांना त्याआधी एक मर्सिडीज गाडी भेट देऊन या कार्यक्रमाचे आयोजन करायला लावले."
हे खरे की खोटे माहीत नाही, पण महामंडळाच्या प्रतिष्ठेला त्यामुळे धक्का बसला आहे. साहित्य महामंडळ विकले गेले आहे अशी चर्चा लोकांत होणे हे चित्र चिंताजनक आहे.
उषा तांबे यांना खुले पत्र!
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 23, 2025
@PawarSpeaks
@supriya_sule
@samant_uday
@rajivkhandekar pic.twitter.com/SjUz8bBvod
ही बातमी वाचा:
























