एक्स्प्लोर
Advertisement
सांगलीत कुस्तीची दंगल, तीन पैलवान डीवायएसपींनी मैदान मारलं
ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी, राष्ट्रकुल स्पर्धेचा सुवर्णपदक विजेता पैलवान नरसिंग यादव आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता पैलवान राहुल आवारे या तिघा डीवायएसपींनी फडात उतरत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला.
सांगली : तीन डीवायएसपी एकाच वेळी कुस्तीच्या आखाडयात उतरल्याचं देशाने पहिल्यांदाच अनुभवलं. निमित्त होतं सांगलीतील खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांच्या वाढदिवसाचं. यावेळी आंतरराष्ट्रीय कुस्ती महादंगल मैदानाचं नागेवाडीजवळ आयोजन करण्यात आलं होतं. डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील हे या मैदानाचे निमंत्रक होते.
कुस्ती क्षेत्रात देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवणाऱ्या आणि कुस्तीच्या जोरावरच पोलिस उपाधीक्षक झालेल्या तीन पैलवानाच्या कुस्त्या हे या मैदानाचं प्रमुख वैशिष्ट्य ठरलं. ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी, राष्ट्रकुल स्पर्धेचा सुवर्णपदक विजेता पैलवान नरसिंग यादव आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता पैलवान राहुल आवारे या तिघा डीवायएसपींनी फडात उतरत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला.
विजय चौधरीची कुस्ती जागतिक कुस्ती स्पर्धेतील रौप्यपदक विजेता जॉर्जियाचा पैलवान टेडोरे लेब्नॉईझे यांच्याशी असल्याने कुस्तीप्रेमीसाठी खास आकर्षण ठरली होती. विजय चौधरीने आपल्या खाकी ड्रेसमध्येच सुरुवातीला मैदानात एन्ट्री केल्याने उपस्थित कुस्तीप्रेमींमध्ये उत्साह संचारला. वर्दीत असलेल्या विजय चौधरीसोबत सेल्फी काढण्यासाठी कुस्तीशौकीनांची झुंबड उडाली होती.
नूतन महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेखची कुस्तीही या मैदानात आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवल्यानंतर बाला रफीकची ही दुसरी कुस्ती होती. या मैदानात पै. नरसिंग यादव, पै. राहुल आवारे या कॉमनवेल्थ गोल्ड मेडलिस्ट मल्लांसह महाराष्ट्र केसरी पै. बाला रफिक शेखने नेत्रदीपक खेळ करत आपापल्या प्रतिस्पर्धी मल्लांना अस्मान दाखवलं.
देश-विदेशातील नामांकित मल्ल खेळलेले हे आजवरचे राज्यातील सर्वात मोठे मैदान मानले जात आहे. तब्बल 50 लाखांहून अधिक रकमेची बक्षिसे यावेळी देण्यात आली. 50 हजार कुस्ती शौकिनाच्या उपस्थितीत मैदानात तब्बल 250 कुस्त्या पार पडल्या.
सात लाख रुपयांचं पहिलं इनाम पटकवण्यासाठी विजय चौधरीची जॉर्जियाचा कुस्तीपटू टेडोरे लेब्नॉईझेमल्ल यांच्याशी कुस्ती झाली. यात घिस्सा डावावर चितपट करुन विजय चौधरी विजयी झाला.
सहा लाख रुपये इनामासाठी द्वितीय क्रमांकाची लढत नूतन महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेख विरुध्द परवेज यांच्यात रंगली. यात बाला रफीकने पोकळ घीसा डावावर परवेजला चितपट केले.
सहा लाखांच्या पारितोषिकासाठी तृतीय क्रमांकाची लढत झाली. ट्रिपल महाराष्ट्र केसरी, पोलिस उपाधीक्षक पै. नरसिंग यादव याने दिल्लीचा भारतकेसरी कमलजीत सिंग यांना पराभूत केलं.
पाच लाखांच्या इनामाची चतुर्थ क्रमांकाची लढत राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता, पोलिस उपाधीक्षक राहुल आवारेची लढत सिनिअर नॅशनल गोल्ड मेडलिस्ट सोनू कुमारशी झाली. या लढतीत राहुल आवारे विजयी झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement