एक्स्प्लोर
सांगलीत धनगर आरक्षणाचा एल्गार, दसरा मेळाव्याला हार्दिक पटेल येणार
आज धनगर समाजाचा आरक्षणासाठी एल्गार होणार आहे. पण आरक्षणासाठी दोन स्वतंत्र मेळावे होणार असल्याने, धनगर समाजात गोंधळाचे वातावरण आहे.
सांगली: कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडीमध्ये आज धनगर आरक्षणासाठी दोन वेगवेगळे दसरा मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे आज धनगर समाजाचा आरक्षणासाठी एल्गार होणार आहे. पण आरक्षणासाठी दोन स्वतंत्र मेळावे होणार असल्याने, धनगर समाजात गोंधळाचे वातावरण आहे. धनगर समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी बिरोबा देवस्थान समितीकडून बिरोबा मंदिरासमोर देवस्थान समितीचा अधिकृत दसरा मेळावा आयोजित केला आहे. दुपारी 2 वाजता हा मेळावा होत आहे. या मेळाव्यास जलसंधारणमंत्री राम शिंदे, खासदार विकास महात्मे यांच्यासह माजी मंत्री आण्णासाहेब डांगे हे उपस्थित राहणार आहेत.
तर आतापर्यंत भाजपचे स्टार प्रचारक राहिलेले गोपीचंद पडळकर हे गुजरातमधील पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांच्या उपस्थितीत आणखी एक मेळावा घेणार आहेत. आरेवाडीच्या बिरोबाच्या बनात हा दसरा मेळावा होत आहे. यामुळे आज गोपीचंद पडळकर आणि गुजरातमध्ये भाजपची दमछाक करणारे नेते हार्दिक पटेल यांच्या एकत्रित तोफा या मेळाव्याच्या माध्यमातून धडाडणार आहेत. या दोन्हीही मेळाव्यात धनगर आरक्षण आंदोलनाबाबत घोषणा केली जाणार आहे. मात्र या निमित्ताने धनगर समाजात दोन गट निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आजवर धनगर आरक्षणासाठी एकवटलेला एकसंघ धनगर समाज, आज मात्र ताकद विभागल्याने संकटात सापडला आहे. मात्र धनगर समाजाच्या या फुटीचा लाभ नेमका होणार कोणाला आणि वेगवेगळे दसरा मेळावा घेऊन प्रश्न सुटणार आहे का? असा प्रश्न धनगर बांधवांसमोर आहे.
आरेवाडी येथील बिरोबा देवस्थानात दरवर्षी दसरा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या काळात लाखो भक्तगण या बनात येतात. या भक्तांचा राजकीय फायदा करुन घेण्यासाठी दोन वर्षांपासून धनगर समाजातील राजकीय मंडळींनी देवस्थान ट्रस्टला हाताशी धरुन, बिरोबा समाजाचा दसरा मेळावा सुरु केला होता. या वर्षीच्या मेळाव्याला मात्र चांगलाच राजकीय गंध लागला आहे.
भाजपपासून फारकत घेतलेले धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दसऱ्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे काल दसरा मेळाव्याचे रणशिंग फुकले आहे. हा मेळावा लक्षवेधी करण्यासाठी गुजरात येथील पटेल आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांची या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हार्दिक पटेल यांनीदेखील धनगर समाजाच्या आरक्षणास पाठिंबा दिला असून आज ते या मेळाव्याच्या माध्यमातून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे या मेळाव्यातून राज्याच्या राजकारणाची आणि धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतची भूमिका समोर येणार आहे.
प्रकाश शेंडगेंची भूमिका
पडळकर यांच्या बरोबरच माजी आमदार आणि धनगर समाजचे नेते प्रकाश शेंडगे हे देखील आज काही धनगर समाजातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दुसरा दसरा मेळावा घेणार आहेत. हार्दिक पटेल जर धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करू असे म्हणत शेंडगे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी होणारा मेळावा एकच व्हावा अशी आशा व्यक्त केली आहे. त्यामुळे आज ‘धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शेवटची लढाई’ अशी साद देत होणाऱ्या या मेळाव्यात धनगर समाजाचे नेते एकत्र येतात की त्यांच्यातील फूट कायम राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
या सरकारने धनगर समाजाची फसवणूक केली आहे. येत्या काही दिवसात जर आरक्षण नाही मिळाले तर या सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय धनगर समाज गप्प बसणार नाही. असा इशारा धनगर समाजाचे नेते आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिला. तसेच हा दसरा मेळावा लाखो धनगर समाज यांच्या उपस्थितीमध्ये आरेवाडीमध्ये होणार आहे. शिवाय या मेळाव्यामध्ये दोन गट पडले आहेत. त्यांनी या मेळाव्यामध्ये यावे आणि एकच दसरा मेळावा व्हावा अशी इच्छा देखील प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement