(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सांगलीतील लाचखोर शिक्षणाधिकारी आणि अधीक्षक निलंबित; विभागीय शिक्षण आयुक्तांची कारवाई
Sangli Crime News : सांगलीतील लाचखोर शिक्षणाधिकारी आणि अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विभागीय शिक्षण आयुक्तांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
Sangli Crime News : शिक्षकांना वेतनश्रेणी मान्यता मिळवून देण्यासाठी लाच घेणाऱ्या शिक्षणाधिकारी आणि अधीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे आणि अधीक्षक विजयकुमार अशोक सोनवणे यांना निलंबित करण्यात आलं आहे. विभागीय शिक्षण आयुक्त सूरज मांडरे यांनी ही कारवाई केली आहे.
काही दिवसांपूर्वी या दोघांना तीन शिक्षकांकडून 1 लाख 70 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं होतं. त्यांच्याबाबत झालेल्या कारवाईचा अहवाल आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तीन शिक्षकांनी वेतनश्रेणी मिळविण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी कांबळे यांच्याकडे सादर केला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी कांबळे आणि सोनवणे यांनी प्रत्येकी 60 हजार रुपयांप्रमाणे 1 लाख 70 हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे दिले तरच प्रस्ताव मंजूर केले जातील, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे शिक्षकांनी 26 एप्रिल रोजी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. या विभागाच्या पथकानं तेव्हापासून ते 2 मेपर्यंत चौकशी केली. त्यावेळी कांबळे आणि सोनवणे यांनी लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं होतं. एक लाख 70 हजार रुपये लाच घेताना दोघांना रंगेहात पकडण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या घरावर छापे टाकून झडती घेण्यात आली होती. कांबळेच्या घरातून दहा लाख रुपयांची रोकड आणि महत्वाची कागदपत्रं जप्त करण्यात आली होती. तर सोनवणेच्या घरात तीन लाखांची रोकड सापडली होती.
काय प्रकरण?
तीन शिक्षकांकडून पदवीधर वेतन श्रेणी मान्यता मिळवून देण्याच्या बदल्यात प्रत्येकी 60 हजार रूपये प्रमाणे लाचेची मागणी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. विष्णू कांबळे आणि विजयकुमार सोनवणे अशी लाच स्वीकारलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. 1 लाख 70 हजार रूपयांची लाच स्विकारताना सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रात्री दोघांना लाचेच्या रकमेसहीत पकडलं होतं. दोघांवर विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्तापर्यंतची सांगली जिल्हा परिषदेतील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
तक्रारदार आणि त्यांचे दोन शिक्षक मित्र यांचे पदवीधर वेतन श्रेणी मान्यता मिळण्याबाबत प्रस्ताव शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, सांगली यांच्याकडे दिला होता. सदरचे काम करून देण्यासाठी शिक्षण अधिकारी कांबळे आणि अधीक्षक सोनवणे यांनी तक्रारदार, त्यांचे शिक्षक मित्र यांच्याकडे प्रत्येकी 60 हजार रूपये प्रमाणे लाचेची मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज 26 एप्रिल रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता.