Sangli News : शिक्षण अधिकारी, अधीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले, सांगली ZPतील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई
Sangli Crime News पदवीधर वेतन श्रेणी मान्यता मिळण्याबाबत प्रस्तावाचे काम करुन देण्यासाठी लाच घेणाऱ्या शिक्षण विभागाचा शिक्षण अधिकारी आणि अधीक्षकाला सांगलीत बेड्या ठोकल्या आहेत.
Sangli News : सांगली जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाचा शिक्षण अधिकारी आणि अधीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले आहे. 3 शिक्षकांकडून पदवीधर वेतन श्रेणी मान्यता मिळवून देण्याच्या बदल्यात प्रत्येकी 60 हजार रूपये प्रमाणे लाचेची मागणी या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. विष्णू कांबळे आणि विजयकुमार सोनवणे अशी लाच स्वीकारलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. 1 लाख 70 हजार रूपयांची लाच स्विकारताना सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रात्री दोघांना लाचेच्या रकमेसहीत पकडले. दोघांवर विश्रामबाग पोलीस स्टेशन मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल झालाय. आत्तापर्यंतची सांगली जिल्हा परिषदेतील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
तक्रारदार व त्यांचे दोन शिक्षक मित्र यांचे पदवीधर वेतन श्रेणी मान्यता मिळण्याबाबत प्रस्ताव शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, सांगली यांच्याकडे दिला होता. सदरचे काम करून देण्यासाठी शिक्षण अधिकारी कांबळे व अधीक्षक सोनवणे यांनी तक्रारदार व त्यांचे शिक्षक मित्र यांचेकडे प्रत्येकी 60 हजार रूपये प्रमाणे लाचेची मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी 26 एप्रिल रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता.
दिलेल्या तक्रारीनुसार अॅन्टी करप्शन ब्युरोने पडताळणी केली असता त्यामध्ये शिक्षण अधिकारी कांबळे व अधीक्षक सोनवणे यांनी लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कांबळे, शिक्षण अधिकारी व सोनवणे, अधीक्षक यांच्याविरूध्द जिल्हा परिषद कार्यालय सांगली तसेच कांबळे यांच्या राहत्या घराजवळ सापळा लावला आणि 1 लाख 70 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले.
शिक्षण अधिकारी कांबळे व अधीक्षक सोनवणे 1 लाख 70 हजार रूपयांची लाच स्विकारताना सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रात्री दोघांना लाचेच्या रकमेसहीत पकडले आहे. आत्तापर्यंतची सांगली जिल्हा परिषदेतील सर्वात मोठी कारवाई मानली जातेय.
या दोघांविरुद्ध विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल झाला आहे.