Sangli Crime News : लाचखोर शिक्षणाधिकारी विष्णू कांबळेच्या अडचणी वाढणार, व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ
Sangli Crime News : लाचखोर शिक्षणाधिकारी विष्णू कांबळेच्या अडचणी वाढणार आहेत. व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये विष्णू कांबळे अनेक धक्कादायक दावे करताना दिसत आहे.
Sangli Crime News : सांगली जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाचा शिक्षण अधिकारी आणि अधीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी 3 शिक्षकांकडून पदवीधर वेतन श्रेणी मान्यता मिळवून देण्याच्या बदल्यात प्रत्येकी 60 हजार रूपये प्रमाणे लाच मागितल्याप्रकरणी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. याप्रकरणी लाचखोर शिक्षणाधिकारी विष्णू कांबळेचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमुळे खळबळ माजली आहे. दरम्यान, विष्णू कांबळे 30 जून रोजी निवृत्त होणार होते. निवृत्तीच्या जवळपास दोन महिन्यांपूर्वी विष्णू कांबळे यांची लाचखोरी उघड झाल्यामुळे चर्चेचा विषय ठरली आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये, "मंत्र्यांच्या गाडीत पेट्रोल टाकावं लागत! पीए येतात, त्यांना पाकीट द्यावं लागतं. हॉटेलला मुक्कामी असले की रुमचे, खाण्या-पिण्याचे भाडे द्यावे लागते. दर 15 दिवसाला हे सगळं करावं लागतं, त्यांना आम्ही नाही म्हणू शकत नाही." , असं विष्णू कांबळे बोलत आहेत. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे लाचखोर शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
3 शिक्षकांकडून पदवीधर वेतन श्रेणी मान्यता मिळवून देण्याच्या बदल्यात प्रत्येकी 60 हजार रूपये प्रमाणे लाचेची मागणी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. विष्णू कांबळे आणि विजयकुमार सोनवणे अशी लाच स्वीकारलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. 1 लाख 70 हजार रूपयांची लाच स्विकारताना सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रात्री दोघांना लाचेच्या रकमेसहीत पकडलं होतं. दोघांवर विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्तापर्यंतची सांगली जिल्हा परिषदेतील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
तक्रारदार आणि त्यांचे दोन शिक्षक मित्र यांचे पदवीधर वेतन श्रेणी मान्यता मिळण्याबाबत प्रस्ताव शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, सांगली यांच्याकडे दिला होता. सदरचे काम करून देण्यासाठी शिक्षण अधिकारी कांबळे आणि अधीक्षक सोनवणे यांनी तक्रारदार, त्यांचे शिक्षक मित्र यांच्याकडे प्रत्येकी 60 हजार रूपये प्रमाणे लाचेची मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज 26 एप्रिल रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :