Samruddhi Highway : दिवाळीपूर्वी समृद्धीचा पहिला टप्पा सुरु होण्याची शक्यता, एमएसआरडीसीचे संचालक राधेश्याम मोपलवारांकडून आढावा
Maharashtra Samruddhi Mahamarg : अनेकदा तारीख देऊनही समृद्धीचं लोकार्पण होऊ न शकल्याने लोकार्पणाची नवीन तारीख जाहीर करण्यात गोपनीयता पाळण्यात येत आहे.
Samruddhi Highway : शिंदे-फडणवीस सरकार राज्यातील जनतेला मोठं दिवाळीपूर्वी गिफ्ट देण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर ते शिर्डी दरम्यान समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) सुरु करण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. याआधी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार असल्याची चर्चा होती. परंतु हा मुहूर्त देखील लांबणीवर पडला असून आता दिवाळीपूर्वी म्हणजे येत्य 23 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना एकमेकांना जोडणारा महाकाय प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग. नागपूर - शिर्डी समृद्धी महामार्गाचा MSRDC चे एमडी राध्येशाम मोपलवर यांनी गुरूवारी आढावा घेतला. समृद्धी महामार्गावरील सुरक्षा, टोल नाके, रुग्णवाहिका , स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग सिस्टीम, सुरक्षा रक्षक आदींचा मोपलवारांकडून आढावा घेण्यात आला. तसेच बुलढाण्यातील पॅकेज सातमध्ये थांबून त्यांनी अभियंत्यांना काही सूचनाही केल्या. दिवाळीपूर्वीच म्हणजे येत्या 23 ऑक्टोबर ला नागपूर - शिर्डी समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. अनेकदा तारीख देऊनही समृद्धीचं लोकार्पण होऊ न शकल्याने लोकार्पणाची नवीन तारीख जाहीर करण्यात गोपनीयता पाळण्यात येत आहे.
दरम्यान शिर्डी ते नागपूर समृद्धी महामार्ग कधी सुरू होणार? या प्रश्नावर म्हणाले, आम्ही तयार आहोत, हा महामार्ग 100% वाहतुकीसाठी सुरू करता येऊ शकतो. मात्र महामार्ग सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री कार्यालय घेणार असल्याने आपल्याला त्याबद्दल निश्चित काही सांगता येणार नाही. त्यामुळे येत्या दिवाळीच्या आधी समृद्धी महामार्गाच्या नागपूर शिर्डी पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होईल का नाही याकडे लक्ष लागून आहे.
या समृद्धी महामार्गामुळे मुंबई-नागपूर प्रवास सहजरित्या आणि कमी वेळेत होणार आहे. नागपूर (Nagpur)-मुंबई (Mumbai) दरम्यान रहदारी सुलभ व्हावी या उद्देशानं 31 जुलै 2015 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 701 किलोमीटरच्या 'समृद्धी महामार्गाची' घोषणा विधानसभेत केली होती. प्रत्यक्षात राज्याच्या 10 जिल्ह्यातून जरी हा महामार्ग जात असला तरी एकूण 24 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे.
लोकार्पणासाठी तारीख पे तारीख
महामार्गाच्या बांधकामाच्या सुरुवातीला अनेक अडचणी आल्यात आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात असल्याचं बोललं जातं आहे. सरकारकडून वारंवार हा महामार्ग सुरु करण्यासंबंधी तारखाही घोषित करण्यात आल्या आहेत. यापूर्वीच्या सरकारकडून ऑक्टोबर 2021, 31 डिसेंबर 2021 आणि आता 31 मार्च 2022 ही तारीख देण्यात आली होती. पण अजूनही समृद्धी महामार्गाचं काम अपूर्ण असल्याची माहिती आहे. आता ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होणार असल्याचं कळतं