एक्स्प्लोर
'बेळगावातील हैदोस, महाराष्ट्रालाही मनगट आहे', सामनातून भाजपवर टीकेचे बाण
मुंबई: 'महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कुणाच्या रागालोभाची पर्वा न करता बेळगावच्या मराठी बांधवांच्या पाठीशी उभं राहावं, असा सल्ला सामनामधून देण्यात आला आहे. बलुचिस्तानातील स्वातंत्र्यसैनिकांच्या किंकाळ्या लाल किल्ल्यावर ऐकू येतात, पण इथेच मराठी सीमा बांधवांचा आक्रोश ऐकू जात नसेल तर न्याय अन्यायाच्या फालतू गोष्टी कोणी करू नये.' असं म्हणत शिवसेनेनं आपलं मुखपत्र 'सामना'तून जोरदार टीका केली आहे.
'महाराष्ट्रालाही मनगट आहे' या मथळ्याखाली सामनात आज अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. शिवसेनेनं सामनामधून केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 'महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही कुणाच्या रागलोभाची पर्वा न करता मराठी सीमा बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे.' असा सल्लाही सामनातून मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे.
दरम्यान, अण्णा हजारे यांनी बेळगाववासियांसाठी उपोषण केलं तर महाराष्ट्राचे हुतात्मे फुलेच उधळतील. असं म्हणत अण्णा हजारेंनाही या आंदोलनात येण्याचं आवाहन सामनातून करण्यात आलं आहे.
एक नजर सामनाच्या अग्रलेखावर:
बेळगावातील हैदोस, महाराष्ट्रालाही मनगट आहे
* सध्या बेळगावात जी ठोकशाही आणि जुलूमशाही सुरू आहे ती लोकशाहीच्या कोणत्या व्याख्येत बसते? कर्नाटकच्या घशात कोंबलेल्या २० लाख सीमा बांधवांचा लढा काही कालचा आणि आजचा नाही. ६० वर्षांपासून तो सुरूच आहे. सहा दशके कानडी पोलीस व तेथील राजकीय गुंड मराठी जनांवर अत्याचार करीत आहेत. तरीही मराठी बांधवांचा लढा संपला नसेल तर मायबाप सरकारने त्यांचा आक्रोश समजून घेतला पाहिजे व न्याय द्यायला हवा, पण येथे रोज घडते आहे ते उलटेच.
* कर्नाटक राज्याचा स्थापना दिवस तेथील मराठी संघटनांनी काळा दिवस पाळला याचे सालाबादप्रमाणे निमित्त करून कानडी पोलिसांनी जो अमानुष हैदोस घातला त्याचा फक्त धिक्कार करून चालणार नाही. या असल्या पोलिसी पशूंवर मानवी हक्काच्या उल्लंघनांचे खटलेच दाखल करायला हवेत व याकामी महाराष्ट्राच्या मराठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. कश्मीर खोर्यात मारल्या गेलेल्या दहशतवादी बुरहान वाणीसाठी येथील ऊरबडवे राजकीय पक्ष मानवी हक्कांचे तुणतुणे वाजवू शकतात. अफझल गुरू व कसाबसारख्या दहशतवाद्यांनाही ‘मानवी हक्क’ वगैरे आहेत बरं का, असेही गळे आपल्याकडे काढले गेलेच होते. भोपाळच्या तुरुंगातून पळून गेलेल्या आठ सिमी अतिरेक्यांना पोलिसांनी गोळ्या घालून मारल्याचे दु:ख देशातील राजकीय पुढार्यांना झालेच आहे व हा सर्व प्रकार म्हणजे मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचा आरोप सुरू आहे.
* सिमीच्या भयंकर अतिरेक्यांना का मारले? असा पुळका येऊन या सर्व प्रकाराची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. हरयाणातील माजी जवानाने केलेल्या आत्महत्येवरूनही सर्वच राजकीय पक्षांनी स्वार्थाची राजकीय तिरडी उचलून ऊरबडवेगिरी चालवली आहे. हा प्रकार पाहता सीमा भागातील अन्यायग्रस्त मराठी बांधवांना न्याय देण्यासाठी हे सर्व ऊरबडवे पुढे का येत नाहीत, असा प्रश्न पडतो. बलुचिस्तानातील स्वातंत्र्यसैनिकांच्या किंकाळ्या लाल किल्ल्यावर ऐकू येतात, पण इकडे आमच्याच देशातील मराठी सीमा बांधवांचा ६० वर्षांपासून सुरू असलेला आक्रोश ऐकू जात नसेल तर न्याय व अन्यायाच्या फालतू गोष्टी कोणी करू नयेत. कुठे आहेत आमचे ते श्री. अण्णा हजारे? सीमा बांधवांवरील अन्यायाविरोधात एखादे उपोषण त्यांनी रामलीला मैदानावर केले तर महाराष्ट्राचे हुतात्मे त्यांच्यावर फुलेच उधळतील.
* बेळगावच्या महापालिकेवर बरखास्तीचा वरवंटा फिरू शकतो. महापौरांच्या कार्यालयावर काळे फेकले जाते, पण काळे फेकण्याची व हल्ले करण्याची क्षमता महाराष्ट्राच्याही मनगटात आहे आणि कोल्हापूरच्या शिवसैनिकांनी ते करून दाखवलेच आहे. मराठी सीमा बांधवांवर अत्याचार करणार्या कानडी मंडळींनी हे लक्षात घ्यावे. कावेरी पाणी प्रश्नावरून रण पेटले तेव्हा तामीळनाडूतील कानडी वस्त्यांवर भयंकर हल्ले झाले होते. म्हणजे मनगटे व अस्मिता सगळ्यांनाच आहेत. तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही कुणाच्या रागलोभाची पर्वा न करता मराठी सीमा बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना दोन निरोप द्यावेत. पहिला निरोप असा की, मुंबईसह महाराष्ट्रात लाखो कानडी बांधव गुण्यागोविंदाने नांदत आहेत व आपला उद्योग, व्यवसाय करीत आहेत. त्यांची काळजी आम्ही घेतच आहोत. मात्र बेळगावातील घटनांमुळे त्यांची झोप उडाली आहे याचा विचार करा. दुसरा निरोप असा द्या की, राज्यात भाजपचे राज्य आल्यापासून विदर्भवाद्यांनी उचल खाल्ली व महाराष्ट्र दिन हे लोक काळा दिवस (चार-पाच टाळकी) साजरा करतात म्हणून त्या काळतोंड्यांचे पार्श्वभाग आमच्या पोलिसांनी सोलून काढले नाहीत हेदेखील जरा समजून घ्या!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement