![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rickshaw beauty compition : सौंदर्य स्पर्धा त्याही रिक्षांच्या! सोबतीला भन्नाट स्टंटही; पंढरपुरातील स्पर्धेची सर्वत्र चर्चा
Rickshaw beauty compition : आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सौंदर्य स्पर्धा पाहिल्या असतील. पण रिक्षांच्या सौंदर्य स्पर्धा ऐकायला थोडे वेगळे वाटते.
![Rickshaw beauty compition : सौंदर्य स्पर्धा त्याही रिक्षांच्या! सोबतीला भन्नाट स्टंटही; पंढरपुरातील स्पर्धेची सर्वत्र चर्चा Rickshaw beauty compition at pandhapur maharashtra Rickshaw beauty compition : सौंदर्य स्पर्धा त्याही रिक्षांच्या! सोबतीला भन्नाट स्टंटही; पंढरपुरातील स्पर्धेची सर्वत्र चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/c5888f57193011dc7f7697ade66ec55a_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rickshaw beauty compition : आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सौंदर्य स्पर्धा पाहिल्या असतील. पण रिक्षांच्या सौंदर्य स्पर्धा ऐकायला थोडे वेगळे वाटते. सर्वसामान्य माणूस नेहमीच रिक्षातून प्रवास करीत असतात. मात्र, आपण रिक्षाकडे फक्त एक प्रवासी वाहन म्हणून पाहतो. प्रवाशांचा सुखद प्रवास व्हावा यासाठी काही हौशी रिक्षाचालक आपल्या रिक्षा अगदी कल्पकतेने सजविण्याचे काम करीत असतात. अशीच एक अनोखी स्पर्धा क्रांतीसूर्य फाऊंडेशनच्या वतीने पंढरपूर येथे घेण्यात आली. ही अनोखी स्पर्धा पाहण्यासाठी शेकडो हौशी नागरिकांनी महात्मा फुले चौकात मोठी गर्दी जमा केली होती. यावेळी काही रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षात मोबाईल, एसी, कुलर, फ्रिज, लॅपटॉप, हेल्थ किट अशा सुविधांबरोबर रिक्षा सजविण्याचे कामही केले. पुणे, कोल्हापूर, सातारा, कऱ्हाड, सोलापूर, सांगली अशा भागातून तब्बल 50 पेक्षा जास्त रिक्षाचालकांनी या सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेतला होता.
या सर्व स्पर्धकांनी आपल्या रिक्षा कशा ठेवल्या आहेत, किती वर्षांपूर्वीची रिक्षा आहे, प्रवाशांना कोणत्या वेगळ्या सुविधा दिल्या आहेत, आपल्या रिक्षात महापुरुषांचे कोणते संदेश दिले आहेत अशा विविध चाचण्यांतून या सर्व रिक्षांची तपासणी परीक्षकांकडून करण्यात आली. यातून राज्यातील स्पर्धेतून पहिला क्रमांक कोल्हापूर, दुसरा क्रमांक पुणे रिक्षा चालकाला मिळाला. तर, सोलापूर जिल्ह्यातील रिक्षा स्पर्धेमध्ये मध्ये पहिला क्रमांक सोलापूर, दुसरा आणि तिसरा क्रमांक पंढरपूरमधील रिक्षाचालकांना देण्यात आला. या सजविलेल्या रिक्षांमध्ये काही रिक्षाचालकांनी टपावर किल्ले उभे केले होते.
यावेळी सांगलीच्या एका रिक्षाचालकाने बहारदार स्टंट दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली. कधी पुढचे चाक उचलून रिक्षा चालवायची तर कधी वेगात दोन चाकांवर रिक्षा चालवायची. असे करत ताशी 50 किलोमीटर वेगाने वेगवेगळे रिक्षाचे स्टंट दाखवले. यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी नगराध्यक्ष नागेश भोसले, वामन बंदपट्टे यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)