श्रीरामपूर भाजप जिल्हाध्यक्षांविरोधात बंड, 257 बूथ प्रमुखांचे सामूहिक राजीनामे
श्रीरामपूर तालुक्यासह परिसरातील 310 बुथप्रमुखांपैकी 257 बुथप्रमुखांनी आज कार्यकर्ता मेळाव्यात आपल्या पदाचा सामूहिक राजीनामा दिला आहे.
शिर्डी : एकीकडे भाजप विरोधात महविकास आघाडी लढाई लढत असताना दुसरीकडे मात्र अहमदनगर उत्तर जिल्हा भाजपा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात कार्यकर्त्यांनी बंड पुकारलं आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भाजपाच्या 310 बुथप्रमुखांपैकी 257 बुथप्रमुखांसह सदस्यांनी आपल्या पदाचा सामूहिक राजीनामा दिला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील सदस्यांनी राजीनामा देऊन संचालन समिती स्थापन करत पक्षाला घरचा आशेर दिलाय.
राज्यातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत आज श्रीरामपूर तालुक्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर मनमानी कारभार करत असून पक्षाची ध्येयधोरणे न राबवता मनमानी कारभार करत असल्याचा आज निषेध करण्यात आलाय.
श्रीरामपूर तालुक्यासह परिसरातील 310 बुथप्रमुखांपैकी 257 बुथप्रमुखांनी आज कार्यकर्ता मेळाव्यात आपल्या पदाचा सामूहिक राजीनामा दिला आहे. श्रीरामपूर शहरातील स्वयंवर मंगल कार्यालयात आज सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली यावेळी सर्वानुमते पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टी संचालन समितीची स्थापना करण्यात आली असून जिल्हाध्यक्षाचा कोणताही निर्णय ही समिती मान्य करणार नाही.
राम शिंदे व राधाकृष्ण विखे पाटील एकच पक्षात असले तरी एकमेकांना शह देत असल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. त्यातच उत्तर नगर जिल्ह्यात विखेंच पारड जड असून यावेळी मात्र राम शिंदे यांनी आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना पद वाटल्याने अस्वस्थता निर्माण झाली असून आता पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार याकड सर्वांच लक्ष लागलं आहे.