रविकांत तुपकरांची तब्येत खालावली; शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा तुपकरांचा निर्धार
पोलिसांनी अशा कितीही कारवाया केल्या तरी मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, जोपर्यंत सोयाबीन-कापूस उत्पादकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा कण खाणार नाही, अशी भूमिका रविकांत तुपकरांनी घेतली आहे.
बुलढाणा : कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नावर बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे वैद्यकीय पथकाकडून त्यांची आज तपासणी करण्यात आली. त्यांना आज रात्रीपर्यंत रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रविकांत तुपकरांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे.
रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. रविकांत तुपकरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांची शुगर व ब्लड प्रेशर कमी झाली आहे. "मला माझ्या जीवाची पर्वा नाही. माझ्या सोयाबीन-कापूस उत्पादकांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहणार. जीव गेला तरी बेहत्तर", असं रविकांत तुपकरांनी म्हटलंय.
रविकांत तुपकरांना उचलून रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. परिसरात स्वाभिमानी कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गर्दी जमली आहे.
रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं रास्तारोको आंदोलन सुरु आहे. आता त्यांची प्रकृती खालावल्याची बातमी आल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून येतंय. ठिक-ठिकाणी रास्तारोको झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील अनेक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. औरंगाबाद-अमरावती, औरंगाबाद- नागपूर, बुलडाणा-अजिंठा, बुलढाणा-अकोला, बुलढाणा-चिखली, बुलढाणा- मलकापूर महामार्गावर शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी रास्तारोको केलं. विदर्भ-मराठावाड्यात हे आंदोलन पेटण्याची चिन्हं आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नावर त्यांनी नागपुरात आंदोलन सुरू केलं होतं. बुधवारी रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी तुपकरांना अटक करण्यात आली. प्रकृती खालावलेल्या तुपकरांना जबरदस्तीने उपचारांसाठी नागपुरात दवाखान्यात नेण्यात आलं. मात्र, त्यांनी उपचारास स्पष्ट नकार देत आपलं अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवलं होतं. अखेर सरकारने तुपकरांना रातोरात जबरदस्तीने पोलीस बंदोबस्तात बुलडाण्याकडे रवाना केलं.
पोलिसांनी अशा कितीही कारवाया केल्या तरी मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. जोपर्यंत सोयाबीन-कापूस उत्पादकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा कण खाणार नाही, अशी भूमिका रविकांत तुपकरांनी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :