चित्त्यावर आमचं जबरदस्त प्रेम, मोदींनी आणलेल्या चित्त्यांपैकी एखादा मिळाला तर घेऊन येणार : रामदास आठवले
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाढदिवसाच्या दिवशी नामिबियातून भारतात चित्ते (Project Cheetah) आणण्यात आले आहेत.
पुणे: चित्त्यांवर (Cheetah) आमचं जबरदस्त प्रेम असून पंतप्रधान मोदींनी आणलेले चित्ते मी पाहायला जाणार आहे, आणि त्यातला एखादा मिळाला तर घेऊन येणार आहे असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale on Cheetah and PM Narendra Modi) यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचंही त्यांनी वक्तव्य केलं. ते माध्यमांशी संवाद साधत होते.
एखादा चित्ता मी घेऊन येणार
केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणलेले चित्ते मी काही अजून बघितले नाहीत, पण नॅशनल पार्कमध्ये असलेला चित्ता मी पाच-सहा वर्षापासून दत्तक घेतला आहे. चित्त्यावर आमचं जबरदस्त प्रेम आहे. दलित पॅन्थरच्या (Dalit Panther) चळवळीमधील जो पॅन्थर होता चपळ असा पॅन्थर होता. आता जे चित्ते आणले आहेत, त्यांचा फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढला आहे. मी ते चित्ते फोटोत पाहिले आहेत. मी सुद्धा ते चित्ते पाहण्यास जाणा आहे. त्यातला एखादा चित्ता जर मला मिळाला तर तो मी घेऊन येणार आहे."
रामदास आठवले पुढे म्हणाले की, "चित्ते भारतीय जंगलामध्ये राहणं आवश्यक आहे. नरेंद्र मोदी आणि आम्ही सर्वजण या जंगलामधले चित्ते आहोत. आम्ही चित्ते असल्यामुळे आम्हाला आमचं काम फत्ते करायचं आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी नामिबियातून भारतात चित्ते (Project Cheetah) आणण्यात आले आहेत. हे चित्ते मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले आहेत. त्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ही प्रतिक्रिया दिली.
एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी
शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यावर वक्तव्य करताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, "दसऱ्या मेळाव्याला शिवाजी पार्कचं मैदान हे एकनाथ शिंदे यांना मिळायला हवं होतं. जसे आरपीआयमध्ये गट आहेत, तसे शिवसेनेमध्ये आता गट पडले आहेत. मला एकनाथ शिंदे यांचा गटच खरी शिवसेना असल्याचं वाटतंय. हायकोर्टाने जरी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल दिला असला तरी सुप्रिम कोर्ट हे एकनाथ शिंदे यांच्या बाजून निकाल देईल, आणि शिवाजी पार्कचं मैदान हे एकनाथ शिंदे यांनाच मिळेल."
महत्त्वाच्या बातम्या :