Rajya Sabha Election : संभाजीराजेंना माघार घ्यावी लागली याचं मला दुःख वाटतं: पंकजा मुंडे
Pankaja Munde On Sambhajiraje : संभाजीराजे छत्रपतींनी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली याचं दुःख वाटतं असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या.
बीड : सर्वांनी मिळून संभाजीराजेंचा सन्मान करायला हवा होता, मात्र प्रत्येक पक्षाने आपला निर्णय घेतला आणि ज्यातून ते झालं त्याचं मला वाईट वाटत आहे असं म्हणत छत्रपती संभाजीराजेंनी राज्यसभेच्या निवडणुकीतून घेतलेल्या माघारीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दुःख व्यक्त केलं. नारायण गडावरच्या विकास कामाचा शुभारंभ झाल्यानंतर पंकजा मुंडे या माध्यमांशी बोलत होत्या.
विधान परिषद निवडणुकीसाठी पक्षाच्या निर्णयाची प्रतीक्षा
आगामी काळात राज्यात दहा विधानपरिषदेच्या जागेसाठी निवडणुका होणार आहेत. या संदर्भात पंकजा मुंडे यांची वर्णी विधानपरिषदेवर लागेल अशी जोरदार चर्चा कार्यकर्त्यात आहे. या संदर्भात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझ्या बाबतीमध्ये पक्ष जो निर्णय घेईल याची प्रतीक्षा सर्वांना आहे, मी त्याबाबत अद्याप कोणाची भेट घेतली नाही.
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात सुटला नाही याला महाराष्ट्रातील अधिकारी जबाबदार असून संबंधित मंत्रालयाने व्यवस्थित डेटा कोर्टात दिला नसल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला. पंकजा मुंडे म्हणाल्या की, "महाराष्ट्र सरकारने आता हे स्वीकारलं आहे की आम्ही मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्राची ओबीसीचा डेटा तयार करू. राज्य सरकार जूनमध्ये हा डेटा कोर्टाला सादर करणार आहे. हा जर अगोदर सादर केला असता तर निश्चितच ओबीसी आरक्षण मिळालं असतं."
दोन वर्ष कोरोनामुळे गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी साजरी करता आली नाही. तरी यावर्षी तो कार्यक्रम साजरा होणार असून 3 जूनला मोठा कीर्तनाचा कार्यक्रम गोपीनाथ गडावर होणार आहे. काही सामाजिक उपक्रम देखील त्या दिवशी घेतले जातील अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
औरंगाबादच्या जल आक्रोश मोर्चामध्ये भाजपचे बडे नेते उपस्थित असताना तुम्ही त्यामध्ये का नव्हता असा माध्यमांनी सवाल केला असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी अपेक्षित असेल तिथे जाते, मात्र मी औरंगाबादच्या मोर्चामध्ये अपेक्षित नव्हते. मी तिथे नसले तरी मी तिथे नसल्याची चर्चा झाली. त्यामुळे मी तिथे असल्याचं मला वाटतं असं पंकजा मुंडे म्हणाल्या.