(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajya Sabha By-Election : राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर, राजीव सातवांच्या रिक्त जागी कुणाला संधी?
Rajya Sabha By-Election - राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी 22 सप्टेंबर अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे तर 4 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे.
मुंबई : महाराष्ट्रात राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसह राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी 22 सप्टेंबर अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे तर 4 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. चार ऑक्टोबर रोजीच या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
दरम्यान, काँग्रेस राजीव सातव यांच्या जागेवर कुणाला पाठवणार? असा सवाल उपस्थित होत आहे. काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांची मागच्या वेळी हुकलेली संधी परत मिळणार की राजीव सातव यांच्या जागी ओबीसी चेहऱ्याचाच विचार होणार अशी चर्चा सुरु आहे. राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना नुकतंच महाराष्ट्र काँग्रेस कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष म्हणून नेमलं आहे.
देवेंद्र फडणवीस गोव्या विधानसभेचे प्रभारी, पक्षानं सोपवली महत्त्वाची जबाबदारी
सोबतच बिहार विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकाही घोषित झाल्या आहेत. या निवडणुका देखील 4 ऑक्टोबरला पार पडतील. तसेच पुद्दुचेरी राज्यसभेच्या एका जागेसाठी 4 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे.
श्चिम बंगालमधील तीन विधानसभेच्या जागांची निवडणूक घोषित
याआधी निवडणूक आयोगानं 4 सप्टेंबर रोजी ओडिसा आणि पश्चिम बंगालमधील तीन विधानसभेच्या जागांची निवडणूक घोषित केली आहे. या तीन जागांसाठी 30 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यात पश्चिम बंगालच्या भवानीपूरचा देखील समावेश आहे. जिथून बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या नेता ममता बनर्जी निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकांची मतमोजणी तीन ऑक्टोबर रोजी होणार आहे. विधानसभेचं सदस्यत्व घेत मुख्यमंत्रीपद कायम ठेवण्यासाठी ममता बॅनर्जी यांना ही निवडणूक जिंकणं अत्यंत महत्वाचं आहे.
ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीत आपला पारंपारिक मतदारसंघ भवानीपूर येथून निवडणूक न लढवता नंदीग्राममधून निवडणूक लढवली होती. तिथं त्यांचा भाजपच्या शुभेंदू अधिकारी यांनी पराभव केला होता. शुभेंदू अधिकारी हे बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत.
पुढील वर्षी देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका
पुढील वर्षी देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर या चार राज्यांमध्ये भाजपाचं सरकार आहे, तर फक्त पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. त्यामुळे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी या पाच राज्यांची निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे.