(Source: ECI/ABP News/ABP Majha)
देवेंद्र फडणवीस गोव्या विधानसभेचे प्रभारी, पक्षानं सोपवली महत्त्वाची जबाबदारी
आगामी काळात पार पडणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपनं कंबर कसली आहे. पक्षानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गोवा विधानसभेच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आहे.
मुंबई : भाजपनं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना गोवा विधानसभेच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आहे. जवळपास सहा महिन्यांनी गोव्यासह अनेक राज्यांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यासाठी पक्षानं प्रभारी म्हणून वेगवेगळ्या नेत्यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, पुढील वर्षी देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली आहे.
राजकारण महाराष्ट्राचं असो वा महाराष्ट्राबाहेरचं. दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींची पहिली पसंती ही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, हे यातून स्पष्ट होत आहे. उत्तरप्रेदश, पंजाब त्यानंतर उत्तराखंड, गोवा, मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुका पुढच्या वर्षी फेब्रुवारीत पार पडणार आहेत. त्यामध्ये गोव्याची जबाबदारी ही देवेंद्र फडणवीसांकडे सोपवण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यापूर्वी गेल्यावर्षी बिहार निवडणुका पार पडल्या होत्या. त्यावेळीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. फडणवीसांनी ही जबाबदारी यशस्वीही करुन दाखवली होती. बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं होतं.
आता देशात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं कंबर कसली आहे. अशातच देवेंद्र फडणवीसांनी बिहार निवडणुकीत पार पाडलेली जबाबदारी लक्षात घेत, आता पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. गोवा हे तुलनेनं छोटं राज्य असलं तरी, ते संवेदशनशीलही आहे आणि राजकारणाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची गोव्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी 2022 सालात होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाची निवडणूक रणनीती आणि इतर सर्व निर्णय प्रक्रिया फडणवीसांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे.
दरम्यान, आगामी काळात ज्या पाच राज्यांत विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर या चार राज्यांमध्ये भाजपाचं सरकार आहे, तर फक्त पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. त्यामुळे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी या पाच राज्यांची निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे.