एक्स्प्लोर
ऊसाला 3200 रुपयांची पहिली उचल द्या, राजू शेट्टींचा एल्गार

कोल्हापूर : ऊसाच्या दरावरुन सरकार आणि सत्तेतला स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष एकमेकांसमोर येण्याची चिन्हं आहेत. यंदा ऊसाला 3200 रुपयांची एकरकमी पहिली उचल द्यावी असा एल्गार राजू शेट्टींनी केला आहे. ऊसाला एक क्विंटलमागे 3200 रुपयापेक्षा एक पैसुद्धा कमी घेणार नाही, असं राजू शेट्टी यांनी ठणकावलं. 'हे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेणारं आहे, मात्र आधीचे सरकार शेतकरी विरोधी होते', अशी टीकाही शेट्टींनी यावेळी केली. 'ज्या ज्या वेळी आंदोलनाची भूमिका घेतली त्या त्या वेळी सरकारने सकारात्मक निर्णय घेतला', असं सांगतानाच 'ज्यांच्या विरोधात आधी आंदोलने केली तेच आता आम्हाला आंदोलन करा असा सल्ला देत आहेत', असा टोला शेट्टींनी हाणला. कोल्हापुरातील जयसिंगपूरमध्ये मंगळवारी ऊस परिषद पार पडली. या परिषदेला हजारो शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. यावेळी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोतसुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते. 'गेल्या वर्षी एफआरपीप्रमाणे ऊसाला भाव मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. गेल्या तीन वर्षांच्या सलगच्या दुष्काळामुळे यंदा ऊसाचं उत्पादन घटलं आहे. त्यामुळे शेतकरी एक इंचसुद्धा माघार घेणार नाही', असं राजू शेट्टींनी ठणकावलं आहे. शेतकऱ्याच्या मागणीचा 5 नोव्हेंबर पर्यंत गांभीर्याने विचार करून निर्णय घ्या, असं आवाहनही शेट्टींनी केलं.
आणखी वाचा























