Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally: विजयी मेळाव्याच्या मराठी व्यासपीठावर फक्त ठाकरे बंधू असणार, भव्य ग्रँड एन्ट्री सुद्धा होणार; ठरलेल्या भाषणांमध्ये कोणती दोन नावे वाढली?
Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally: शेवटी समारोपाचं भाषण उद्धव ठाकरे यांचं असेल. यावेळी वरळी डोमच्या बाहेर हाजी अली, वरळीला जाणारे दोन्ही रस्ते पॅक होतील.

Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally: मराठी एकजुटीच्या बळावर हिंदी सक्तीचा वरवंटा महाराष्ट्रातून मोडून काढल्यानंतर आज (5 जुलै) ठाकरे बंधूंचा विराट विजय मेळावा होत आहे. या मेळाव्याकडे अवघ्या राज्याचं नव्हे, तर देशाचे लक्ष लागून राहिलं आहे.या मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 18 ते 19 वर्षांनंतर राज आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकाच मुद्द्यावर आणि एकाच धोरणाने एकत्र येत आहेत. त्यामुळे ठाकरे बंधू या व्यासपीठावरून महाराष्ट्राला कोणता कानमंत्र देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. दरम्यान व्यासपीठाची अत्यंत दिमाखदार पद्धतीने तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे व्यासपीठावर कोण असणार याची सुद्धा उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
व्यासपीठावर केवळ ठाकरे बंधू असणार
समोर आलेल्या माहितीनुसार व्यासपीठावरती केवळ ठाकरे बंधू असणार आहेत. एन्ट्री सुद्धा ग्रँड होईल, अशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे. याचाच अर्थ व्यासपीठावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असतील. मराठी विजयी मेळाव्यात प्रकाश रेड्डी, जयंत पाटील (शेतकरी पक्ष), सुप्रिया सुळे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे अशी भाषणं होतील. (जर कांग्रेसचे नेते आले तर त्यांना भाषण दिलं जाईल, अशी शक्यता आहे.) शेवटी समारोपाचं भाषण उद्धव ठाकरे यांचं असेल. यावेळी वरळी डोमच्या बाहेर हाजी अली, वरळीला जाणारे दोन्ही रस्ते पॅक होतील. तिथे स्क्रीन लावली जाणार आहे. बहुदा दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद केले जातील.
आज साहेबांना ऐकण्याचा दिवस
दरम्यान, या मेळाव्यासाठी कोण कोण उपस्थित राहणार याकडे लक्ष आहे. काँग्रेसच्या उपस्थितीविषयी साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे वरळी डोममध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली आहे. या ठिकाणी मनसे नेते संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर सकाळीच तयारीचा आढावा घेण्यासाठी पोहोचले. त्यांनी जास्त काही प्रतिक्रिया न देता आज साहेबांना ऐकण्याचा दिवस असल्याची प्रतिक्रिया नांदगावकर यांनी दिली. दुसरीकडे संदीप देशपांडे यांनी बोलताना जे बाराखडी शकणार नाही त्यांचे बारा वाजणार असल्याचा पुन्हा एकदा इशारा दिला.
बुलंद आवाज महाराष्ट्रामध्ये देणार का?
या सर्व पार्श्वभूमीवर आज मराठी विजय मेळाव्यामध्ये ठाकरे बंधू आगामी विविध महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणता राजकीय संदेश सुद्धा देणार का? युतीसाठी काही संकेत देणार का? याकडे सुद्धा राजकीय जाणकारांचे लक्ष लागून राहिलं आहे. ज्या पद्धतीने या मोर्चाची तयारी करण्यात आली आहे, गेल्या आठ दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांकडून होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांना पलटवार करत मनसे आणि शिवसेना ठाकरे नेत्यांकडून ज्या पद्धतीने संयुक्त पद्धतीने प्रतिकार करण्यात आला ते पाहता ही भविष्यातील मनोमिलनाची नांदी तर नाही ना? अशी सुद्धा चर्चा रंगली आहे. मात्र, युतीच्या संदर्भात दोन्ही पक्षातील नेत्यांकडून जाहीर पद्धतीने कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. हा सर्वस्वी निर्णय दोन बंधूंवर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी पण हे दोन बंधू एकत्रित येत बुलंद आवाज महाराष्ट्रामध्ये देणार का याकडे सुद्धा लक्ष असेल.
इतर महत्वाच्या बातम्या























