Rahul Gandhi : महाविकास आघाडीचा 9 जागांवरील तिढा सुटेना; राहुल गांधींकडून थेट उद्धव ठाकरे अन् शरद पवारांना फोनाफोनी!
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवर संवाद साधला. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिन्ही नेत्यांमध्ये जागावाटपांवर चर्चा झाली.
मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra) लोकसभेच्या (Loksabha Election 2024) 48 जागांपैकी काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांच्यात 39 जागांवर तोडगा निघाला असला, तरी 9 जागांवर प्रश्न अडला आहे. आज (22 फेब्रुवारी) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवर संवाद साधला. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिन्ही नेत्यांमध्ये जागावाटपांवर चर्चा झाली. जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची (MVA) 27 फेब्रुवारीला बैठक आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा आहे.
काँग्रेस मुंबईतील लोकसभेच्या 6 पैकी 3 जागांवर इच्छूक
येत्या 27 आणि 28 तारखेला महाविकास आघाडी लोकसभा जागावाटप संदर्भात बैठक होणार असून या बैठकीमध्ये अंतिम निर्णय जागावाटपावर होईल, असा विश्वास महाविकास आघाडीचे नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. सूत्रांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसला मुंबईतील लोकसभेच्या 6 पैकी 3 जागांवर निवडणूक लढवायची आहे. मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई दक्षिण मध्य या तीन जागा आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चार जागांवर उमेदवार उभे करायचे आहेत. मात्र, मुंबई शिवसेनेला (यूबीटी) लोकसभेच्या कोणत्या चार जागा हव्या आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मुंबईतील जागा कळीचा मुद्दा राहणार
दुसरीकडे, आज काँग्रेसची राज्य निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसकडून मुंबईमध्ये सहापैकी तीन जागांची मागणी करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून ज्या जागांवर दावा करण्यात आला आहे, त्याच जागेवर काँग्रेसकडूनही दावा करण्यात आल्याने आता हा कळीचा मुद्दा राहणार आहे. देशातील सर्वाधिक लोकसभेच्या जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात बोलणी यशस्वी झाली आहेत. लोकसभेच्या 80 जागा असलेल्या यूपीमध्ये काँग्रेसने 17 जागांवर निवडणूक लढवण्याचे मान्य केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या