South Central Lok Sabha constituency : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंना शह देण्यासाठी ठाकरेंना हुकमी उमेदवार मिळाला; मतदारसंघातही वावर वाढला
अनिल देसाई यांनी दक्षिण मध्य मुंबई मधील मानखुर्द आणि चेंबूर विभागात विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. अनिल देसाई यांनी मानखुर्द महाराष्ट्र नगरमधील कबड्डी सामन्याचे देखील उद्घाटन केले.
South Central Lok Sabha constituency : शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांना शह देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने खासदार अनिल देसाई यांना दक्षिण मध्य मुंबई मधून उतरवल्याचे चित्र आहे. आज अनिल देसाई यांनी दक्षिण मध्य मुंबई मधील मानखुर्द आणि चेंबूर विभागात विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. अनिल देसाई यांनी मानखुर्द महाराष्ट्र नगरमधील कबड्डी सामन्याचे देखील उद्घाटन केले.
पक्ष प्रमुखांनी अजून घोषित केलेलं नाही
अनिल देसाई म्हणाले की, कबड्डीचे रसिक आस्वाद घेतील, पण या विभागातील अनेक प्रश्न आहेत. हा क्रीडा महोत्सव असून स्थानिक लोकांना अनेक खेळ खेळवतो, पण ते व्यवसायिक किंवा वेगवेगळ्या पातळीवर घेतलं तर मुलांना संधी मिळते. शिवसेना राजकीय पक्ष असला तरी निवडणूक नसताना देखील कार्यक्रम घेतले जात आहेत. आगामी काळात निवडणूक जाहीर होतील. खेळाडू खेळत असतील त्यांना पुढं जाण्यासाठी हातभार लावला असं म्हणता येईल. दक्षिण मध्य मुंबई उमेदवारीवर ते म्हणाले की, चित्र माध्यम रंगवत आहेत. पक्षप्रमुखांनी अजून घोषित केलेलं नाही. ज्यावेळी नाव जाहीर करतील तेव्हा मी असो किंवा इतर कोणी उमेदवार असो जे आदेश पक्षप्रमुख देतील त्याचं पालन करू.
अनिल देसाई यांचे स्वीय सहाय्यकांना ईडीकडून समन्स
दुसरीकडे, अनिल देसाई यांचे स्वीय सहाय्यकांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. ते म्हणाले की, दिनेश कंपनीत काम करत होते तिथे फायनान्सरचे काम पाहत होते, याला राजकीय रंग लावता कामा नये. त्यांच्या ऑफिसातील कोणी तक्रार केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला हे मी तुमच्या माध्यमातून ऐकलं. चौकशीला सामोरे जायला ते तयार आहेत.
दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी ठाकरे गटाचा दावा
दुसरीकडे, दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरुन तिढा निर्माण झाला आहे. ठाकरे गटाकडून (Thackeray Group) या जागेसाठी दावा करण्यात आला आहे. येत्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये ठाकरे गटाकडून अनिल देसाई रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. अनिल देसाई यांना तयारी करण्याबाबत हिरवा कंदील देण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. त्यामुळे काही दिवसांपासून अनिल देसाई हे दक्षिण मध्य मुंबईमधील शाखांना भेटी देणे त्यासोबत बैठका घ्यायला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर केल्यास शिवसेना खासदार राहुल शेवाळे विरोधात उभे राहू शकतात. याच जागेवर काँग्रेसकडून देखील दावा आहे. काँग्रेसकडून मुंबईमध्ये सहापैकी तीन जागांची मागणी करण्यात आली. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून ज्या जागांवर दावा करण्यात आला आहे, त्याच जागेवर काँग्रेसकडूनही दावा करण्यात आल्याने आता हा कळीचा मुद्दा राहणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या